Raj Thackeray मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत भर पावसात पदाधिकारी मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी लाडका भाऊ आणि लाडका बहीण योजनेवरुन टोलेबाजी केली. तसंच ज्यांना पक्ष सोडून जायचा आहे त्यांनी खुशाल जावं मी त्यांना रेड कार्पेट घालून देतो असं म्हणत पक्ष सोडून जाणाऱ्यांनाही खडे बोल सुनावले आहेत. तसंच राज्यातली आणि बाहेरच्या देशातली परिस्थिती काय काय आहे? यावरही भाष्य केलं.
काय म्हणाले राज ठाकरे? ( What Raj Thackeray Said )
मागच्या २५ दिवसांपासून परदेशात होतो. अमेरिकतल्या बृहन महाराष्ट्र मंडळाने मला बोलवलं होतं. मी हॉटेलच्या खाली उभा होतो तेव्हा तिथे एक मुलगा आला त्याच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. मला म्हणाला काहीही करा पण माझ्या रेस्तराँला या. मी त्याला म्हटलं मी बघतो, तर म्हणाला मला माहीत नाही तुम्ही यायलाच पाहिजे. जेवणासाठी आलं पाहिजे. मी म्हटलं का? तर म्हणला लहान असताना तुमची भाषणं ऐकून परदेशात आलो आणि इथे व्यवसाय सुरु केला. मी त्याला म्हणालो की तुला देश सोडायला सांगितलं नव्हतं. पण सांगण्याचा मुद्दा हा की असेही लोक आहेत जे आपलं अस्तित्व निर्माण करतात. १०० लोकांच्या सिटिंगचं रेस्तराँ त्याने उभारलं आहे. त्या रेस्तराँमध्ये दोन तासांचं वेटिंग होतं त्यात चाळीस टक्के परदेशी लोक होते. हे पाहून खरंच बरं वाटतं असं राज ठाकरेंनी सांगितलं. मला असंख्य मराठी लोक तिकडे भेटले, त्यावेळी त्यांच्या व्यवसायांबाबत मला त्या मराठी लोकांनी सांगितलं. असं राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले.
आपल्या परंपरांमध्ये आपण बदल केले पाहिजेत
मराठवाड्याबाबत मी मागे बोललो होतो की अशीच स्थिती तिथे राहिली तर ४० वर्षात तिथे वाळवंट होईल. पुन्हा परिस्थिती पूर्ववत करायची असेल तर १५० वर्षे लागतील. बेसुमार जंगलतोड चालू आहे. हजारो एकर जमिनींवर जंगलतोड सुरु आहे. मी आल्यानंतर विचार करत होतो की आपणही गोष्टी सुधारल्या पाहिजेत. जंगलतोड का होते आहे? याचा नीट विचार करा. आधी आपल्या धर्माकडे पाहिलं पाहिजे. हजारो लोक जेव्हा मरतात तेव्हा त्यांच्या पार्थिवावरचे अंत्यसंस्कार लाकडांवर केले जातात. लाकडांचा सर्वाधिक पुरवठा स्मशानभूमींमध्ये केला जातो. विद्युत दाहिनींचं प्रमाण ०.१ टक्केही नाही. आपणही धर्मातल्या परंपरा पाळण्यासाठी जंगलतोड करतो यामध्ये सुधारणा होणं आवश्यक आहे. काही गोष्टी काळानुरुप बदलाव्या लागतील. ज्यांच्याकडे मुबलक जंगलं आहेत ते प्रेतं पुरत आहेत. मात्र आपल्याकडे जंगलतोड होते आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार यांनी विद्युत दाहिनींची संख्या वाढवली पाहिजे. असंही राज ठाकरे यांनी ( Raj Thackeray ) म्हटलं आहे.
लाडका भाऊ आणि बहीण योजनेवरुन टीका
मूळ गोष्टींकडे म्हणजे पाणी, नोकरी, आरोग्य याकडे कुणाला लक्ष द्यायला वेळ नाही. आपल्याकडे काय आहे? लाडकी बहीण आणि लाडका भाऊ. अहो लाडकी बहीण आणि लाडका भाऊ दोन्ही पक्ष एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. त्यासाठी योजना कशा पाहिजेत? बहिणीला १५०० रुपये देणार, भावाला इतके देणार. राज्य सरकारकडे पैसे आहेत का? रस्त्यावरचे खड्डे बुजवायला पैसे नाहीत. मूळ प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हेच महाराष्ट्र विधानसभेसाठी तुमचं कँपेन असलं पाहिजे. एकमेकांना शिव्या द्यायच्या लोकांची दिशाभूल करायची आणि निवडणूक लढवायची यातून काही हाताला लागत नाही असंही राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले.