Raj Thackreray On Chhagan Bhujbal : काही दिवसांपूर्वीच छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष सोडत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. छगन भुजबळ यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना समीर भुजबळ यांच्यावर खोचक शब्दात टीका केली होती. राजकारणातील सर्व पुतण्यांचा डीएनए सारखाच आहे, असे ते म्हणाले होते. याशिवाय त्यांनी काही नेत्यांची उदारहरणंदेखील दिली होती. यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भाष्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे आज एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान, त्यांना छगन भुजबळांच्या विधानाबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, “छगन भुजबळांनी आता आमच्यासारख्या पुतण्यांना बरोबर घेऊन एक पक्ष काढावा”, असा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा – MNS Seventh Candidates List : मनसेच्या सातव्या यादीत १८ जणांना संधी, आतापर्यंत किती शिलेदार रिंगणात? वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर!

“छगन भुजबळांनीही काकांची साथ सोडली”

पुढे बोलताना, “खरं तर छगन भुजबळसुद्धा पुतण्याबरोबरच पक्षातून बाहेर पडले. ते काकांबरोबर थांबले नाहीत. त्यांनी तरी किमान काकांची साथ सोडायला नको होती”, अशी प्रतिक्रियाही राज ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा – MNS Candidates List : मनसेची सहावी यादी जाहीर; मुंबई-ठाण्यातील महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा!

छगन भुजबळ काय म्हणाले होते?

समीर भुजबळ यांच्या बंडखोरीबाबत बोलताना, “राजकारणात असलेल्या सर्वच पुतण्यांचा डीएनए सारखाच आहे, असं वाटायला लागलंय. शरद पवार यांचा पुतण्या, अजित पवारांचा पुतण्या, गोपीनाथ मुंडेंचा पुतण्या, बाळासाहेब ठाकरेंचा पुतण्या, अशी अनेक पुतणे कंपनी आहे, हे सर्व काकांचं ऐकतात असं वाटत नाही. त्यामुळे राजकारणातील सर्वच पुतण्यांचा एक वेगळाच डीएनए आहे”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं.