आटपाट नगर होतं. या नगरात बाळराजे नावाचा एक ख्यातनाम किर्तीचा चित्रकार होता. जगभरातले लोक बाळराजांना मान देत. त्यांच्या कलेच्या एकेका फटकाऱ्याने दिग्गज घायाळ होत असा लौकिक होता. आपल्या या कलेच्या जोरावर बाळराजांनी मानमरातब, दौलत कमावली आणि या नगरात आपलं स्वतंत्र विश्व उभं केलं.

बाळराजांना दादू नावाचा एक मुलगा होता. त्याच्याकडे वडलांची कला नाही आली. पण तो आज्ञाधारक होता, विनयशील होता व सगळ्यात मुख्य म्हणजे बाळराजेंच्या पत्नीचा माँसाहेबांचा लाडका होता. बाळराजेंना एक पुतण्याही होता राजसाहेब. वडिलांपेक्षा काकांच्याच सावलीत राज लहानाचा मोठा झाला. त्यानं काकाची कलाही आत्मसात केली, इतकी की लोक म्हणायला लागले की बाळराजेंची गादी राजसाहेब चालवणार. राजला पण वाटायचं आपण काकासारखंच थोर चित्रकार व्हावं आणि त्यांच्या गादीवर बसावं. राजनी तर आपलं करीअर ठरवून टाकलं. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं.
बाळराजेंच्या स्टुडिओचा पसारा वाढला होता. संपूर्ण कलाविश्वात वावर होता आणि नगरातल्या कलाविश्वातल्या प्रत्येक घडामोडीत बाळराजेंच्या शब्दाला वजन होतं. पण बाळराजे थकले होते. वारस नेमायला हवा होता. परंतु बाळराजे पडले कट्टर लोकशाहीवादी. त्यांना होता हुकुमशाहीचा अत्यंत तिटकारा. त्यामुळे त्यांनी आपल्या स्टुडिओशी संबंधित सगळ्या कलाकारांना एकदा बोलावलं, त्यांच्या कुटुंबासारखेच होते ते…

म्हणाले आज आपण सगळ्यांनी लोकशाही मार्गाने माझा वारस निवडुया. तर तुमच्या इच्छेला मान देऊन मी दादुला माझा वारस जाहीर करतो. बाळराजेंच्या मुखातून लोकांचीच इच्छा बाहेर पडते यावर अपार श्रद्धा असलेल्या सगळ्यांनी बाळराजेंचा जयजयकार करत लोकशाही मार्गानं निवड झालेल्या दादुच्या हातावर टाळी दिली आणि मनगटावर निष्ठेचा गंडा बांधला.

सगळी स्वप्नं धुळीला मिळालेल्या राजनं मग वेगळा स्टुडिओ काढायचं ठरवलं. बाळराजेंच्या स्टुडियोत पहिल्यापासून राबता असल्यानं त्यानं तिथले काही आर्टिस्ट फोडले आणि सुरू केला आपला स्टुडियो. राज जोमानं आपली चित्र विकायला लागला. पार पुण्यक्षेत्र नाशिकमध्ये त्याच्या चित्रांना चांगलाच प्रतिसाद मिळाला व तिथंही त्यानं एक स्टुडियो थाटला. बाळराजेंची गादी नसली तर काय झालं, त्यांच्याइतकाच मोठा चित्रकार मी होणार अशा जोमानं त्यानं चित्र विकायला सुरूवात केली. दादू काय बाळराजेंची जागा घेणार? त्याला तर साधी एक रेषदेखील काढता येत नाही असं राजला वाटायचं. त्यामुळे शेवटी त्यांच्या स्टुडिओतले सगळे कलाकार व सगळे ग्राहक शेवटी आपल्याकडेच येणार अशी खात्रीच होती म्हणा ना!

पण दादू भलताच हुषार निघाला. त्यानं बाळराजेंची जुनी जुनी चित्रं शोधून काढली, त्यांच्याच अनेक प्रिंट काढल्या नी विकायला सुरुवात केली. लोकांना चित्रात नाही, चित्रकारात इंटरेस्ट असतो. लोकं माणसाला मत देतात, माणसाच्या मताला किंमत देत नाहीत हे लोकशाहीतलं महत्त्वाचं सूत्र दादूला नीट कळून चुकलं होतं. त्यामुळे दादूनं बाळराजेंच्या फोटोलाच त्यांच्या चित्रांसह गादीवर बसवलं आणि स्टुडियोवर ताबा मिळवला.
बाळराजेंची कला नसलेला दादू वरचढ झाला तर बाळराजेंची कला असलेला पण त्यांचं संचित नसलेला राज कुढायला लागला. एक एक स्टुडियो बंद पडायला लागलेला. रोज नवी नवी चित्र तरी कुठून आणणार या विचारानं वैतागलेल्या राजला एकेक कलाकार सोडून जायला लागले.
त्यांचा निर्लज्जपणा तर इतका वाढला की बाळराजेंनी ज्या कमळाबाई नावाच्या जुन्या जाणत्या कलाकाराला दाराबाहेर तिष्ठत ठेवलं होतं, त्या कमळाबाईच्या अर्ध्या चड्डीतल्या मुलांच्या गळ्यात गळे राजचे कलाकार घालत होते. अनेक कलाप्रदर्शनात हेच कळत नसे की हे कलाकार राजच्या स्टुडियोतले आहेत की दादूच्या की कमळाबाईच्या.

त्यात आणखी एक संकट कोसळलं. नाशिकचा स्टुडियो उंदरांनी पोखरला आणि बघता बघता भुईसपाट झाला. राजच्या करीअरपुढे गंभीर संकट ठाकलं. तसं तर त्यालाही चित्र काढायचा नी विकत बसायचा कंटाळा आला होता. तो चित्रकार म्हणून थोर होता, पण एकच चित्र वर्षानुवर्ष विकायचं बाळराजेंचं कसब त्याच्याकडे नव्हतं. त्यामुळं करीअरसाठी वेगळं काही शोधणं भाग होतं.

अशा विचारमग्न अवस्थेत असतानाच एक फोन आला.

कात्रजचा घाट म्हणून चित्रकलेतलं एक मोठं घराणं आहे. या घराण्याशी जवळिक असलेल्या एका मातब्बर कलाकाराचा हा फोन होता. संगीताच्या क्षेत्रात जशी ग्वाल्हेर, आग्रा, किराणा, पतियाळा अशी घराणी आहेत तसं चित्रकलेच्या प्रांतातलं कात्रजचा घाट एक नावाजलेलं घराणं होतं. या घराण्याचं वैशिष्ट्य म्हणजे मागणी तसा पुरवठा हे यांचं ब्रीदवाक्य. ग्राहकाला जे हवंय ते चित्र काढावं व विकावं, उगाच कमळाबाईसारखी फालतू तत्वं बित्व मिरवू नयेत इतका साधा सोपा हिशोब. या घराण्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रकलेबरोबरच इतरत्र असलेला वावर आणि कुणीही विन्मुख जाणार नाही ही वृत्ती.

पहिलीच आवृत्ती खपत नाही म्हणून मेताकुटीला आलेल्या कंगाल कवीला कुठल्यातरी प्रतिष्ठानचा पाच लाखांचा पुरस्कार मिळवून देणं असो वा कात्रजच्या घराण्याची भाटगिरी करणाऱ्या बेघर पत्रकाराला मुख्य प्रधान कोट्यातून फ्लॅट देणं असो… इथं कधी कुणी रिकाम्या हाती परत गेला नाही अशी ख्याती होती.

कात्रजच्या घाटाचे संस्थापक राजे शरच्चंद्र मोठा उमद्या दिलाचा गडी. लोकाचं दु:खं त्यांना बघवत नसे. आपल्या स्टुडियोमधल्या एखाद्याला लाथ मारून बाहेर काढतानादेखील ते त्याच्या हातात दुसऱ्या स्टुडियोचं अपॉइंटमेंट लेटर ठेवत अशी किर्ती होती त्यांची.

त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या चित्रांतल्या रेषांपेक्षा त्यांनी न काढलेल्या रेषांचीच चर्चा अधिक होत असे. असंही झालंय की त्यांच्याकडून चार चार वेळा पारखून चित्र विकत घेतलं नी घरी आल्यावर वेष्टन काढलं तर कॅनव्हास संपूर्ण कोरा, फक्त खाली राजे शरच्चंद्र अशी लफ्फेदार सही.
कला समीक्षकही त्या कोऱ्या कॅनव्हासमध्ये न दिसणाऱ्या रेषांचं अमाप कौतुक करत नी मॉडर्न आर्टची सुरूवातच शरच्चंद्रांपासून होते असं सर्टिफिकेट देत. त्या ग्राहकाला कळायचं नाही की या चित्राचं करायचं काय? पण तोही बिचारा आपण मूर्ख ठरू नये म्हणून शरच्चंद्रांचं कौतुक करत असे.
तर अशा नामवंत गोटातून फोन आल्यामुळे राजला जरा हायसं वाटलं. त्यानं विचारलं काय काम आहे. कुठे नी कधी भरवायचंय चित्रांचं प्रदर्शन?
नाही तुम्हाला चित्र नाही काढायचंय, तुम्हाला कात्रजच्या घाटाच्या संस्थापकांची मुलाखत घ्यायचीय. चित्रं काढणं असंही आपल्याला झेपत नाहीये हे लक्षात आलेल्या राजला मुलाखतकार बनण्याची ही संधी मोहावून गेली. असंही गाडगीळ, खाडिलकर वगैरे गेल्या पिढीतले मुलाखतकार झाले होते नी तिथं पोकळी होतीच. स्टुडियो नसलेला चित्रकार हा बॅट नसलेल्या फलंदाजासारखा असतो, हे राजला अनुभवानं ठावूक झालं होतंच. त्यामुळं अखेर राजनं ही संधी साधलीच आणि झाला मुलाखतकार.

असंही म्हणतात, की बाळराजेंशी असलेल्या मैत्रीला जागत कात्रजच्या घाटाच्या राजानं या राजाची ही सोय लावली… कुणाच्या हाताला काम नसेल तर त्यांना बघवत नाही असं म्हणतात ते काही खोटं नसावं! असो!

Story img Loader