“ग्रीक नाटकांमध्ये संपूर्ण नाटकाचं कथासूत्र तोलून धरणाऱ्या सूत्रधाराला ‘सिंगल पर्सन कोरस’ म्हणून ओळखलं जातं; स्वत:ला सतत नव्याने घडवण्याची क्षमता आणि जुन्या बाद संकल्पना मोडीत काढून नव्या कल्पना स्वीकारण्याची हिंमत असलेले राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातले ‘सिंगल पर्सन कोरस’ आहेत”, असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी नुकतेच मुंबईत काढले. सोशल मीडियाचा सजग वापर करणारे पत्रकार कीर्तिकुमार शिंदे यांनी लिहिलेल्या ‘दगलबाज राज’ या पुस्तकाचे प्रकाशन कांदिवली येथील तेरापंथ भवनात अंबरीश मिश्र यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकात कीर्तिकुमार शिंदे यांनी फेसबुक, ब्लॉग्ज आणि पोर्टल्स या ऑनलाइन माध्यमांमध्ये वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचे संकलन करण्यात आले आहे. विविध प्रश्नांवर राज यांनी घेतलेल्या भूमिका, मनसेने केलेली आंदोलने यांच्यामागची सैद्धांतिक बाजू मांडणारे हे लेख आहेत. ‘दगलबाज राज’ हे या पुस्तकाचे शीर्षक मराठीचे सखोल आकलन नसलेल्याला चमकवून टाकणारे आहे. त्यामुळे, मिश्र यांनी राज यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘दगलबाज शिवाजी’ या शीर्षकाच्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन “शिवाजी महाराजांना कपटाने मारायला आलेला अफझलखान कसा ‘दगाबाज’ होता आणि त्याचं कपट ओळखून त्याचा डाव त्याच्यावर उलटवणारे शिवाजी महाराज कसे ‘दगलबाज’ म्हणजे मुत्सद्दी-चाणाक्ष होते,” यातला फरक समजावून सांगितला. राज ठाकरे यांचे अनेक निर्णय परस्परविरोधी वाटले तरी त्यामागे त्यांची काही ठोस विचारसरणी आहे, हे महत्त्वाचे आहे, असे सांगून मिश्र म्हणाले की आज मनसेची स्थिती डळमळीत दिसत असली, तर राजकारणात एकच स्थिती कायम राहात नसते, ही परिस्थितीही पालटून मनसेला ऊर्जितावस्था येईलच.
मनसेचे प्रवक्ते व नेते अविनाश अभ्यंकर यांनी या कार्यक्रमात “व्यंगचित्रांच्या माध्यमातून राज ठाकरे हे सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावी वापर करत आहेत. मात्र राजकीय कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या आहारी न जाता त्याचा योग्य तितकाच वापर करायला हवा” असं मत व्यक्त केलं. ‘बिगुल’ पोर्टलचे संपादक मुकेश माचकर यांनी आपल्या भाषणात “कीर्तिकुमार शिंदे यांचं ‘दगलबाज राज’ हे पुस्तक म्हणजे गेल्या चार वर्षांतल्या राजकीय घडामोडींचा इतिहासच आहे. हे पुस्तक वाचनीय तर आहेच, पण त्याचबरोबर त्याला एक संदर्भमूल्य आहे”, असं मत व्यक्त केलं.
लेखक कीर्तिकुमार शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना “सनातनी विचारांचे राजकीय पक्ष आणि तथाकथित पुरोगामी विचारांचे राजकीय पक्ष यांच्या उक्ती आणि कृतींमधील अंतर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्यामध्ये एकप्रकारचा साचलेपणा आला आहे. राज ठाकरे मात्र कोणत्याही प्रकारच्या दबावाला, अनुनयाला किंवा लांगुलचालनाला बळी न पडता आपली राजकीय वाटचाल करत आहेत” असं मत व्यक्त केलं. या कार्यक्रमाचे आयोजन मनसेचे कांदिवली विभागअध्यक्ष हेमंतकुमार कांबळे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल माईणकर यांनी केले. कबीर प्रकाशनाचे संचालक डी. एस. जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर या प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थित होते.