नाशिक शहराला वेगळे परिमाण प्राप्त करून देण्याचा वारंवार पुनरुच्चार करणारे आणि अतिशय वाजतगाजत आजवर शहरात दाखल होणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी नाशिकचा अतिशय गुप्तपणे काही तासांचा अकस्मात दौरा केल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहे. स्थानिक पातळीवरील तीन ते चार प्रमुख लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता त्यांच्या या दौऱ्याची खबर अन्य आमदार व पदाधिकाऱ्यांनाही नव्हती.
महापालिकेत सत्ता प्राप्त होऊन वर्षभराचा कालावधी उलटून गेल्यानंतरही विकासकामे होत नसल्याची ओरड होत आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून राज हे वैतागलेले होते. आपल्या हाती जादूची कांडी नसून विकासकामांसाठी थोडा वेळ द्यावा लागेल, असेही त्यांनी मध्यंतरी सूचित केले होते. शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी मुंबईहून वास्तुविशारदांचे एक खास पथकही त्यांनी नाशिकला आणून नवनवीन संकल्पना राबविण्याचा प्रयत्न चालविला आहे. शुक्रवारी तज्ज्ञांच्या या पथकाला ते हेलिकॉप्टरमार्गे नाशिकला घेऊन आल्याची माहिती मनसेचे आ. वसंत गिते यांनी दिली. एका खासगी शाळेतील हेलिपॅडवर सकाळी आठ वाजता त्यांचे हेलिकॉप्टर उतरले. त्यानंतर लगोलग ते मोटारीने गोदापार्कवर पोहोचले. साधारणत: एक ते दीड तासात राज व त्यांच्या पथकाने गोदापार्कचे अवलोकन केले आणि त्यानंतर लगेचच म्हणजे सकाळी साडेनऊपर्यंत ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. राज यांचा हा खासगी दौरा असल्याचे गिते यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत आ. गिते, महापौर यतीन वाघ, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे हेच स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील मनसेचे इतर आमदार व कार्यकर्त्यांना राज यांच्या दौऱ्याचा थांगपत्ताही लागला नाही. विकासकामांबद्दल ओरड होत असल्याने राज यांनी या पद्धतीने दौरा केल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात होत आहे.
राज ठाकरे यांची ‘गुपचूप’ नाशिक भेट
नाशिक शहराला वेगळे परिमाण प्राप्त करून देण्याचा वारंवार पुनरुच्चार करणारे आणि अतिशय वाजतगाजत आजवर शहरात दाखल होणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी नाशिकचा अतिशय गुप्तपणे काही तासांचा अकस्मात दौरा केल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहे.
First published on: 11-05-2013 at 02:07 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackrey secret visit to nashik