‘घर घर राज.. राज घर-घर’ अशी घोषवाक्ये लिहिलेल्या टोप्या घातलेले निवडक कार्यकत्रे, गाडय़ांची रांग, बहुतेक गाडय़ांवरील क्रमांक मराठीत लिहिलेले. दुचाकीवर मनसेचे झेंडे. ‘साहेबां’ना पाहण्यासाठी एकच झुंबड. मोठय़ा दालनात खुर्चीत बसलेले उमेदवार.. प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांचा अल्याड-पल्याडचा खेळ एवढा रंगला की, जोरदार रेटारेटी झाली. प्रवेशद्वारातून आत घेतले म्हणजे उमेदवारी मिळालीच, अशा थाटात गर्दी उसळली. उत्साही गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. मात्र, दुपारनंतर राज ठाकरे यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी हॉटेलमध्ये आराम करणे पसंत केले. त्यामुळे धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील उमेदवारांच्या मुलाखती पक्षनेते आमदार बाळा नांदगावकर व अतुल सरपोतदार यांनी घेतल्या.
शहरातील सागर लॉन्स येथे मराठवाडय़ातील उमेदवारांच्या मुलाखती सकाळी साडेनऊ वाजता होतील, असे जाहीर करण्यात आले होते. स्वत: राज ठाकरेच मुलाखत घेण्यास येणार असल्याने कार्यकर्त्यांनी शहरभर त्यांच्या स्वागताचे फलक उभारले होते. इच्छुकांनी मोठे फलक उभारले. सकाळी कार्यकर्त्यांनी गाडीला झेंडे लावून दुचाकी फेरी काढली. जिल्ह्यातील सर्व इच्छुकांशी राज ठाकरे यांनी एकत्रित संवाद साधला. प्रत्येक मतदारसंघातून कोण इच्छूक, तो किती दिवसांपासून काम करतो आहे, याची माहिती घेताना उमेदवार दिल्यास काय राजकीय गणिते होऊ शकतात, याची तपासणी केली जात होती. नांदगावकर व सरपोतदार यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना एखादा प्रश्न राज ठाकरे विचारत होते, असे मुलाखत देण्यास आलेल्या उमेदवारांनी सांगितले.
परंतु दुपारनंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते हॉटेलवर परतले. नंतर पत्रकारांशीही संवाद साधता येणार नाही, ‘खोकल्याची उबळ येते आहे’, असे सांगून ते थेट मुंबईलाच परतले. मराठवाडय़ातील ४६ जागांवर मनसे उमेदवार उभे करील, असे सांगून बाळा नांदगावकर यांनी मराठवाडय़ाकडून बऱ्याच अपेक्षा असल्याचे सांगितले. काही तडजोडीच्या जागाही लढविणार असल्याचेही एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले. लातूर येथे आमदार अमित देशमुख यांच्या विरोधात उमेदवार उभा केला जाईल, असे सांगत मत्री वेगळी व राजकारण निराळे, असे सांगायलाही नांदगावकर विसरले नाहीत.
उसनी मफलर आणि सूचक स्मित!
राष्ट्रवादीवर घणाघाती टीका करताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मफलरचा उल्लेख हिणकसपणे केला होता. छगन भुजबळ यांना टोचून बोलताना केलेल्या उल्लेखावर सध्या तिरकस टिप्पणी केली जात आहे. नाशिक महापौर निवडणुकीत मनसेने राष्ट्रवादीशी केलेल्या हातमिळवणीवर ‘मफलर उसनी घेतली आहे काय’, असे विचारले असता नांदगावकर यांनी, ‘त्यांनी स्वत:हून पािठबा दिला आणि आम्ही घेतला. भुजबळांना सुबुद्धी झाली,’ असे म्हणत उत्तर देण्याचे हसून टाळले.
‘खोकल्याची उबळ’ आल्याने राज अर्ध्यावरच परतले
‘घर घर राज.. राज घर-घर’ अशी घोषवाक्ये लिहिलेल्या टोप्या घातलेले निवडक कार्यकत्रे, गाडय़ांची रांग, बहुतेक गाडय़ांवरील क्रमांक मराठीत लिहिलेले. दुचाकीवर मनसेचे झेंडे. ‘साहेबां’ना पाहण्यासाठी एकच झुंबड. मोठय़ा दालनात खुर्चीत बसलेले उमेदवार.. प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांचा अल्याड-पल्याडचा खेळ एवढा रंगला की, जोरदार रेटारेटी झाली.
First published on: 16-09-2014 at 01:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thakre return on marathwada