शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे अवघ्या महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात आली. राजकीय, सामाजिक, इतिहासतज्ज्ञ अशा सर्वच क्षेत्रांमधून बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनानंतर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. आता राज ठाकरेंनी बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनानंतर त्यांना व्यंगचित्राच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून हे व्यंगचित्र पोस्ट केलं आहे.
काय आहे या व्यंगचित्रात?
राज ठाकरेंनी या व्यंगचित्रातून छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्यातील संवाद दाखवला आहे. त्यात उजवीकडे सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज बसलेले असताना डावीकडे बाबासाहेब पुरंदरे हात जोडून उभे आहेत. या व्यंगचित्रात छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब पुरंदरेंना उद्देशून म्हणतायत, “ये रे माझ्या गड्या, मला शोधण्यासाठी जगभर खूप पायपीट केलीस. अविश्रांत मेहनत घेतलीस, माझ्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलंस! ये आता जरा आराम कर”.
यात वर मोठ्या अक्षरात “शिवाज्ञा” असं राज ठाकरेंनी लिहिलं आहे.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर राज ठाकरेंनी अत्यंत भावुक शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक आज साक्षात त्यांची सेवा करण्यासाठी निघाला, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी पुरंदरे यांच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, “बाबासाहेबांनी आपलं आयुष्य शिवचरित्र सांगण्यासाठी खर्च केलं. परंतु असं असतानाही वर्तमानातील प्रश्न आणि भविष्यातली आव्हानं ह्याबाबत त्यांच्याकडून कायमच मार्गदर्शन मिळत राहिलं. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते माझे मार्गदर्शक तर होतेच, पण मला पितृतुल्यही होते”.
या पोस्टमध्ये राज ठाकरे पुढे म्हणतात, “बाबासाहेब मला नेहमी सांगत, “महाराजांचा जिथे जिथे पदस्पर्श झाला आहे, तिथे तिथे मी आजपर्यंत अनेकदा गेलो आहे. आता फक्त एकच जागा उरली आहे ती म्हणजे महाराज जिथे गेले आहेत तिथे जायची”. शिवछत्रपती महाराजांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला. इतिहास संशोधक, शिवचरित्रकार, महाराष्ट्र भूषण, सन्माननीय बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनम्र श्रद्धांजली”.