नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांनी मंगळवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. युवकांना संघटित करून विधायक कार्याकडे वळविण्याचा सल्ला हजारे यांनी राजळे यांना दिला.
लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजळे यांनी राळेगणसिद्धी येथे हजारे यांची भेट घेतली. आपले आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे राजळे यांनी हजारे यांच्याशी बोलताना स्पष्ट केले. दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. सरपंच जयसिंग मापारी, माजी सरपंच गणपतराव औटी, विजय मचे या वेळी उपस्थित होते. या वेळी झालेल्या चर्चेत बोलताना हजारे म्हणाले, की कोणत्याही राजकीय पक्षातील सर्वच लोक वाईट नाहीत. राष्ट्रवादीतदेखील काही लोक चांगले आहेत. आपणास उमेदवारीची संधी मिळाली आहे. पुढील काळात युवकांना संघटित करून विधायक मार्गाकडे वळविण्यासाठी राजळे यांनी प्रयत्न करावेत असे सांगत चांगल्या कामाला विरोध होतो, मात्र ध्येयाने काम करीत राहिल्यास हा विरोध मावळतो असेही हजारे यांनी सांगितले.

Story img Loader