Rajan Salvi Joins Shivsena Eknath Shinde: शिवसेना (उद्धव ठाकरे) उपनेते व उद्धव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे राजन साळवी यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) गटात प्रवेशाचा निर्णय जाहीर करताच राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. कधीकाळी उद्धव ठाकरेंचे विश्वासू म्हणून मानले जाणारे राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे हा ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे. यावर ज्यांना न्यायचंय त्यांना न्या पण जनतेचं काम करा असं म्हणत आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व घडामोडींमध्ये आता राजन साळवींनी प्रवेशाच्या आधी केलेल्या सूचक विधानाची चर्चा सुरू झाली आहे.

काय म्हणाले राजन साळवी?

राजन साळवींनी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश करण्याआधी टीव्ही ९ शी बोलताना पक्षप्रवेशाबाबत भूमिका मांडली आहे. “२०२४ च्या निवडणुकीतील पराभवासाठी जी मंडळी कारणीभूत आहेत त्यांची माहिती मी उद्धव ठाकरेंना दिली. त्यानंतर मी शांत होतो. पण आज मी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या पराभवाला जी मंडळी कारणीभूत आहेत, ज्या लोकांनी माझ्याविरोधात काम केलं आहे त्यासंदर्बातली सर्व माहिती, पुरावे शिवसेना पक्षप्रमुखांकडे दिले. त्यानंतर मला वाटलं की आता आपण थांबावं. पण मतदारसंघ व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा उभं राहावं असा मला मतदारसंघातल्या मंडळींनी आग्रह केला. त्यानुसार मी हा निर्णय घेतला आहे”, असं राजन साळवी म्हणाले.

विधानपरिषदेची आमदारकी?

दरम्यान, राजन साळवींना पक्षप्रवेशानंतर विधानपरिषदेची आमदारकी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. त्यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी सूचक विधान केलं. “मी ज्या पक्षात सुरुवातीपासून काम करतोय. तिथे शिवसैनिक, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख आणि नंतर उपनेता या पदांवर मी काम केलं आहे. तीनदा आमदार होतो. आता एकनाथ शिंदे ठरवतील. माझा त्यांच्यावर विश्वास आहे. मला त्यांनी मोठ्या भावासारखं प्रेम द्यावं हीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे”, असं त्यांनी नमूद केलं.

विनायक राऊतांनी नितेश राणेंचं नाव घेत निवडणुकीच्या काळात राणेंचं काम केल्याचा आरोप केल्याबाबत विचारणा केली असता राजन साळवींनी याचे पुरावे सादर करण्याचं आव्हानच विनायक राऊत यांना दिलं आहे. “गेल्या ३८ वर्षांमध्ये मी शिवसेना पक्षप्रमुखांनी दिलेल्या आदेशांनुसार काम केलं आहे. मी ठामपणे सांगू शकतो की याआधीच्या काळात माझ्याकडून एक अंशही चुकीचं काम झालेलं नाही. असेल तर त्याची माहिती दिली जावी. मी कुणाकडून पैसे घेतल्याचा आरोप असेल तर त्यांनी सिद्ध करावा. त्यांनी पुरावा दिल्यास त्याच दिवशी मी राजकीय संन्यास घेईन”, असं राजन साळवी म्हणाले आहेत.

उदय सामंतांना शह देण्यासाठी साळवींचा प्रवेश?

“विनायक राऊत असं म्हणतायत की उदय सामंतांना शह देण्यासाठी मला पक्षात घेतलं जात आहे. पण यात कुठेही शह-काटशहाचा मुद्दा नाहीये. आम्ही सगळ्यांनीच हातात हात घालून जिल्ह्यात शिवसेना वाढवली पाहिजे अशा सर्वांच्या भावना आहेत”, असंही राजन साळवी यावेळी म्हणाले.

Story img Loader