रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-लांजाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत उपनेतेपदाचा राजीनामा दिला. साळवी हे गुरुवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नाराज राजन साळवी हे भाजपमध्ये जाण्याची चर्चा होती. साळवी यांचा पक्षत्याग हा कोकणात ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ‘मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले काम मी आजपर्यंत केले आणि त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे,’ असे सांगितले होते. मालमत्तेबाबत पोलिसांकडून वारंवार होणारी चौकशी आणि पक्ष संघटनेतील वादाला कंटाळून त्यांनी ठाकरे गटाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले जाते.
नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, तीन वेळा आमदार, आता उपनेते अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता असून त्यांना तसा शब्द देण्यात आल्याची चर्चा आहे.