Rajan Salvi Join Eknath Shinde Shiv sena : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-लांजाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज (बुधवार) साळवी यांनी काही कार्यकर्त्यांबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाण्यातील आनंद आश्रम येथे हा कार्यक्रम पार पडला. राजव साळवी यांचा हा पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना राजन साळवी म्हणाले की, “मी स्वत:ला नशीबवान समजतो, कारण ही जागा पवित्र आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्पर्शाने ही जागा पवित्र झाली आहे. आज माझ्या दोन्ही डोळ्यांमध्ये अश्रु आहेत. एका डोळ्यामध्ये दु:ख अश्रु आहेत. गेले ३८ वर्ष शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेत काम करत असताना नगरसेवक, नगराध्य़क्ष, शिवसेनेचा जिल्हाप्रमुख, २००९, २०१४, २०१९ या कालावधीत मी आमदार होऊ शकलो, त्यानंतर शिवसेना उपनेता झालो. या संपूर्ण वाटचालीत सर्वसाधारण कुटुंबातील सदस्य एवढ्या मोठ्या पदावर पोहचला आणि तो पक्ष मला आज मागे टाकून आता मला नवीन प्रवाहामध्ये यावं लागतंय. त्यामुळे माझ्या डोळ्यात नक्कीच दु:ख अश्रु आहेत”.

“तर दुसर्‍या डोळ्यात आनंद अश्रु आहेत, कारण कुटुंबातील सदस्य म्हणून भाईंनी (एकनाथ शिंदे) माझ्यावर प्रेम केलं. २०२२ पर्यंत भाईंनी मला कुटुंबातील एक छोटा भाऊ म्हणून मार्गदर्शन केलं. एक दु:ख नक्कीच आहे की अडीच वर्षापूर्वी भाई मुख्यमंत्री होत असताना त्यांच्याबरोबर जाऊ शकलो नाही. ती त्या वेळची परिस्थिती असेल. पण निश्चितपणे त्यानंतरच्या काळात हा निर्णय घेतला आणि भाईंनी मला सामावून घेतले. हा आनंदाचा क्षण आहे,” असे साळवी यावेळी बोलताना म्हणाले.

“२०२४ साली मला पराभवाला सामोरे जावं लागलं, याला जबाबदार कोण? हा प्रश्न मी आपल्यासमोर मांडला आहे. २०१४ साली भाजपा सेनेची युतीची सत्ता आली आणि त्या युतीमध्ये मला वाटलं होतं की माझ्यासारखा निष्ठावंत मंत्री होईल म्हणून. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंकडे माझी शिफारस केली होती, पण दुर्दैवाने होऊ शकलो नाही. पण शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी त्यावेळी दीपक केसरकर यांना मंत्री केलं. राजन साळवी तिथंच राहिला. तो काळ गेला, २०२४ ची निवडणूक आली, तेव्हाही वाटलं होतं राजन साळवीला संधी मिळेल, मंत्री होईल. उदय सामंत शिवसेनेत आले आणि २०१९ ला मंत्री झाले, ” असे साळवी म्हणाले.

“२०२४ च्या निवडणुकीत आम्ही पराभूत झालो, पराभव मान्य केला. पण २०२४चा पराभव हा माझ्या कुटुंबाला आणि पदाधिकार्‍यांच्या जिव्हारी लागला,” असेही राजन साळवी म्हणाले.

साळवींची एकनाथ शिंदेंकडे विनंती

“गेले आठवडाभर राजन साळवींना विधानपरिषद देणार, महामंडळ देणार हे मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. पण भाईंना (एकनाथ शिंदे) मी एवढचं नम्रपणे सांगेल की, मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सर्व काही मिळालं आहे. मला काही नको. मी अत्यंत समाधानी आणि आनंदी आहे. माझी फक्त एकच अपेक्षा आहे की, माझ्याबरोबर आलेले राजापूर लांजा मतदारसंघातील सर्व मतदार, माझे शिवसैनिक, माझे पदाधिकारी त्यांना योग्य तो सन्मान आणि योग्य त्या अनुषंगाने जे काही देता येईल ते द्यावे. माझ्यापेक्षा माझ्या पदाधिकाऱ्यांना सांभाळावे अशी विनंती करतो,” असे राजन साळवी म्हणाले.