शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार राजन साळवी यांच्या घरावर आणि हॉटेलवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी छापा टाकून त्यांच्यासह त्यांची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम साळवी यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रत्नागिरी विभागाचे उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह सुमारे २० अधिकारी आणि कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. त्यांच्याबरोबर रायगडच्या लाचलुचपत विभागाचेही काही अधिकारी रत्नागिरीत दाखल झाले होते. गुरुवारी सकाळी ८ वाजल्यानंतर लाचलुचपत विभागाचे पथक आमदार साळवी यांच्या बंगल्यासह सात विविध ठिकाणी दाखल झाले. सायंकाळी सात वाजेपर्यंत कागदपत्रे आणि इतर वस्तूंची तपासणी चालू होती.
दरम्यान, या कारवाईनंतर आमदार राजन साळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. साळवी म्हणाले, एसीबीने काल सकाळी ९ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत माझ्या मालमत्तेची चौकशी पूर्ण केली. त्यानंतर जाताना ते म्हणाले, आजच्या दिवसापुरती चौकशी पूर्ण झाली आहे. या चौकशी आणि तपासाचा अहवाल आम्ही आमच्या वरिष्ठांना देऊन. त्यांच्या निर्देशानुसार पुढील कारवाई करू.
दरम्यान, राजन साळवी यांच्या डोक्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे. याबाबत ते म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे, रत्नागिरी पोलीस ठाण्यात माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह माझी पत्नी आणि मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की, ते लोक (एसीबी) मला कधीही अटक करू शकतात.
हे ही वाचा >> आमदार अपात्रतेचा निर्णय बदलणार? उच्च न्यायालयाच्या नोटिशीवर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया; म्हणाले…
आमदार राजन साळवी म्हणाले, त्यांनी माझा आयफोन जप्त केला आहे. माझ्या घरातील वस्तूंचं मोजमाप केलं आणि त्यांच्या किंमती ठरवल्या. त्या अनुषंगाने त्यांनी एक अहवाल तयार केला आहे. माझा मोबाईल नेऊ नये अशी विनंती मी त्यांना केली होती. तरी त्यांनी मोबाईल नेला आहे. लोकांशी संपर्क करण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी आपल्याला फोन लागतो. त्यामुळे मी त्यांना माझा फोन परत मागितला आहे. तसेच त्यांना म्हटलं आहे की, माझ्यावर कारवाई करा, परंतु, माझी पत्नी आणि मुलावर कारवाई करणं चुकीचं आहे.