शिंदे गटात या नाहीतर पोलिसांच्या मार्फत नोटीस देण्यात येतात. काहींना तडीपार करण्यात तर, काहींवर गुन्हे दाखल करण्यात आलं. तुमच्या हिंमत असेल तर समोर समोर या ना. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कशाला त्रास देता, असे आव्हान शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं आहे.
नवी मुंबईत शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा पार पडली. यावेळी राजन विचारे बोलत होते. शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यावरून विचारेंनी शिंदेंवर हल्ला केला आहे. “नवी मुंबईत शिवसेनेचा एक आठवड्यापूर्वी मेळावा झाला होता. तो मेळावा यशस्वी झाल्यावर काही लोकांच्या मनात पोटशूळ उठले आहे. मेळाव्याला उपस्थित असलेल्यांचे जुने केसेस काढले जात आहेत. शिंदे गटात येण्यासाठी धमकी दिली जात आहे. मात्र, या धमक्यांना आम्ही घाबरत नाही,” असे राजन विचारेंनी ठणकावलं आहे.
हेही वाचा – एकनाथ खडसेंनी पोलीस अधिकाऱ्यासमोर जोडले हात, म्हणाले ‘हवं तर पाया पडतो’, पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
“कोणाला त्रास देत आहे…”
“एम. के. मडवी यांना तडीपार केलं आहे. उपजिल्हाप्रमुखावर सुद्धा केसेस दाखल केल्या आहेत. दिघ्यातील मेळाव्यात उपस्थित राहिल्याबद्दल शिवसैनिकांना नोटीस देण्यात आल्या. काय चालवलं, कोणाला त्रास देत आहे. तुमच्यात हिंमत असेल तर, समोर समोर या ना. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन त्यांना कशाला त्रास देता. त्यांना त्यांचे काम करु द्या. पोलिसांनी असाच अन्याय सुरु ठेवला तर रस्त्यावर यावे लागेल, मग कोणीच थांबवू शकत नाही,” असा इशारा राजन विचारेंनी दिला आहे.