राजापूर विधानसभा मतदारसंघ हा रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर व लांजा या दोन तालुक्यांचा व संगमेश्वर तालुक्यातील कोंडगांव महसूल मंडळाचा समावेश होतो. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन प्रभाकर साळवी हे राजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. २००९, २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत राजन साळवी हे सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत साळवी यांनी काँग्रेसच्या अविनाश लाड यांचा ११ हजारांहून अधिक मताधिक्याने पराभव केला.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांनी काँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड यांचा पराभव केला होता. राजन साळवी यांना ६५४३३ मते मिळाली, तर अविनाश लाड यांना ५३५५७ मते मिळाली होती. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते अविनाश लाड यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी राजन साळवी यांच्यावर आरोप करुन राजापूरची जागा काँग्रेसलाच मिळावी अशी भूमिका घेतली होती. परंतु, राजापूरचे विद्यमान आमदार राजन साळवी हे ठाकरेंच्या शिवसेनेत असल्याने ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळाली.
हेही वाचा : Kankavli Assembly Constituency: नितेश राणेंना संदेश पारकर रोखणार का ?
महायुतीत राजापूरची जागा शिंदेंच्या शिवसेनेला
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राजापूर विधानसभा मतदारसंघात साळवी यांच्या विरोधात उमेदवार देण्याचे आव्हान महायुतीतील भाजप व शिंदेंच्या शिवसेनेसमोर होते. शिवसेनेचे नेते व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधु किरण सामंत राजापूरमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर लांजा तालुक्यातील भांबेडमधील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राजापूर विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली. किरण सामंत यांना राजापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी मिळाली.
शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत शिंदे सेनेची बाजी
राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशा झालेल्या लढतीमध्ये तीन टर्म आमदार राहीलेले महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार राजन साळवी यांचा महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी तब्बल १९ हजार ६८० मताधिक्क्याने पराभव केला.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून सामंत यांनी घेतलेले मताधिक्क्य शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवले. प्रत्येक फेरीप्रमाणे वाढत जाणार्या त्यांच्या मताधिक्क्याने कार्यकर्त्यांचा विजयाचा जल्लोष अधिकच वाढवित होता. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीसोबत ढोल ताशांचा गजर व फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा करणार्या शिवसैनिकांनी विजयी झालेले किरण सामंत मतमोजणी कक्षातून बाहेर येताच त्यांना उचलून घेत विजयाचा एकच जल्लोष केला.
मतमोजणीमध्ये पोष्टल मतदानामध्ये राजन साळवी यांना ७४८ तर, किरण सामंत यांना ६९७ मते मिळाली. त्यानंतर ईव्हीएम मशिनमधील मतमोजणीला सुरूवात झाली. अंतिम निकालाअंती महायुतीचे किरण सामंत यांना ८० हजार २५६ मते, महाविकास आघाडीचे राजन साळवी यांना ६० हजार ५७९ मते, अपक्ष उमेदवार अविनाश लाड ७ हजार ९४५ मते, संदीप जाधव १ हजार ६५ मते, अमृत तांबडे १ हजार २०९ मते, यशवंत हर्याण यांना २८६ मते, राजेंद्र साळवी यांना १ हजार ७४ मते, संजय यादवराव यांना ३७२ मते मिळाली. नोटाला १ हजार ८३० मतदारांनी पसंती दिली.