राजापूर : राजापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार, शिवसेनेचे नेते किरण सामंत, महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार डॉ. राजन साळवी आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, यशवंत हर्याण असे चौघांनी आज गुरुवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यातून, राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आजपासून खर्या अर्थाने निवडणूक रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. जॅसमिन यांनी या सार्यांचे उमेदवारी अर्ज स्वीकारले.
हेही वाचा : Sameer Bhujbal : छगन भुजबळांच्या घरात बंडखोरी, समीर भुजबळांनी निवडला वेगळा रस्ता!
विधानसभा निवडणूकीला उमेदवारी अर्ज भरण्याला सुरूवात झाली आहे. त्यांनतर, उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालावधीतील पहिले दोन दिवस निरंक राहील्यानंतर तिसर्या दिवशी राजापूर विधानसभा मतदारसंघातून तब्बल तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आणि आमदार डॉ. साळवी यांनी शिवसेनेचे नेते अजित यशवंतराव, काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफे, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांसह महाविकास आघाडीचे अन्य पदाधिकार्यांसमवेत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, महायुतीचे उमेदवार सामंत यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पालकमंत्री उदय सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल पंडीत यांच्यासह महायुतीचे अन्य पदाधिकारी यांच्यासमवेच उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लाड यांनी काँग्रेसच्या पदाधिकार्यांसमवेत उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी, या तीनही उमेदवारांनी शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या जाहीर सभांमध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मतदारांशी संवाद साधला. यावेळी मोठ्यासंख्येने संबंधितांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून पालकमंत्री उदय सामंत शुक्रवारी शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शुक्रवारी सकाळी महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर ते उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.