जालना – परळी येथील राजस्थानी मल्टिस्टेट को ऑपरेटीव्ह सोसायटीचा अध्यक्ष चंदूलाल मोहनलाल बियाणी (वय ६०) याला जालन्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड येथून मंगळवारी अटक केली. ‘राजस्थानी मल्टिस्टेट’च्या अनेक ठेवीदारांची विविध जिल्ह्यांतील शाखांमधून फसवणूक झालेली आहे. यामध्ये जालना येथील सदर बाजार पाेलीस ठाण्यातही एक गुन्हा दाखल आहे. चंदूलाल बियाणी याला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे, नीलेश ईधाटे, समाधान तेलंग्रे आदींच्या पथकाने केली आहे. दरम्यान, ज्या ठेवीदारांनी या सोसायटीत गुंतवणूक केली आहे, ती रक्कम मिळाली नाही, अशा गुंतवणूकदारांनी जालना आर्थिक गुन्हे शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
राजस्थानी मल्टिस्टेटमध्ये जवळपास ३५० कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा करून चंदूलाल बियाणी पसार झाला होता. मल्टिस्टेटच्या अनेक संचालकांवरही गुन्हे दाखल असून, साधारण तीन महिन्यांपूर्वी चंदूलाल बियाणीला अटक करण्यात आली. त्यापूर्वी त्याच्या मुलाला अटक झाली आहे.