राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना हाताशी धरुन अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा ठपका असणारे राजेंद्र घनवट यांच्या पत्नीचे आकस्मिक निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. ४६ वर्षीय मनाली राजेंद्र घनवट यांनी सोमवारी पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मात्र, त्यापूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
काय म्हटलं आहे अंजली दमानियांनी?
खूप खूप धक्कादायक !
राज घनवट, जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत, त्यांच्या पत्नीच्या आकस्मित मृत्यू झाला आहे. कारण स्पष्ट नाही. पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना नेण्यात आले होते. राज घनवट हे धनंजय मुंडे यांच्या कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहेत, याच राज घनवटने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या आहेत व याच जमिनीच्या चौकशीची मागणी, मी महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे केली होती. ही आत्महत्या आहे असे त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे पण तो नैसर्गिक मृत्यू आहे असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. मनाली राजेंद्र घनवट यांचा मृत्यू नैसर्गिक नसून ती आत्महत्या असल्याचा संशय अंजली दमानिया यांनी व्यक्त केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानिमित्ताने धनंजय मुंडे आणखी एका वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
राजेंद्र घनवट यांच्यावर कोणते आरोप?
काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी एक पत्रकार परिषद घेत राजेंद्र घनवट यांचा उल्लेख केला होता. धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी राजेंद्र घनवट यांनी राजकारण्यांना हाताशी धरत त्यांच्या जमिनी लाटल्या .खोटे गुन्हे दाखल त्यांना जेरीस आणले. मयत व्यक्तीला जिवंत दाखवलं जिवंत यांना मयत केलं आणि व्यवहार केला. धनंजय मुंडे चार वर्षांपूर्वी माझ्याकडे तेजस ठक्कर यांच्या सोबत आले होते. तेव्हा पंकजा मुंडे यांच्या विरोधात पुरावे घेऊन प्रकरण लावून धरा यासाठी धनंजय मुंडे आले होते यावेळी राजेंद्र घनवटही त्यांच्यासोबत असल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितलं होतं. व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनी संदर्भात मुख्यमंत्री आणि अजित पवार यांना भेटले आहे. यात दोन संचालक आहेत त्यातील एक राजेंद्र घनवट आणि पोपटराव घनवट. या दोघांनी ११ शेतकऱ्यांना छळून त्रास दिलाय. जे जे शेतकरी यांच्या विरोधात लढायचे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. राजेंद्र घनवट हे धनंजय मुंडे यांचे पार्टनर आहेत, असा आरोप दमानियांनी केला होता.