महाराष्ट्राच्या राजकारणात २ जुलै रोजी मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षतील ४० हून अधिक आमदारांना आपल्याबरोबर घेऊन अजित पवार यांनी वेगळा गट बनवला. या गटासह त्यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला. त्याचबरोबर त्यांनी सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेच्या शिंदे गटाशी हातमिळवणी केली. अजित पवार या गटासह महाराष्ट्राच्या सत्तेत वाटेकरी झाले. गेल्या साडेतीन महिन्यांपासून अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. तर त्यांच्या गटातील आठ आमदार मंत्री झाले आहेत. अजित पवार महायुतीत गेल्यापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा सातत्याने वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. विरोधी पक्षांमधील नेते असो अथवा अजित पवारांचे समर्थक, अनेकांनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील असा दावा केला आहे.
स्वतः अजित पवार आणि राज्यातील महायुतीतले पक्ष अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचे दावे फेटाळून लावत आहेत. अशातच गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र यांनीदेखील यावर भाष्य केलं. अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल तर त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री करू. वेळ येईल तेव्हा त्यांना मुख्यमंत्री करू, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.
हे ही वाचा >> “…तर १०,००० कोटी रुपये वाचले असते”, मेट्रो कार डेपोच्या कंत्राटावरून आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर आरोप
दरम्यान, अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि आमदार राजेंद्र शिंगणे यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे. शिंगणे यांनी काही वेळापूर्वी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिंगणे म्हणाले, अजित पवार हे भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारच, एक दिवस ते मुख्यमंत्री होतील, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. ते कधी मुख्यमंत्री होणार, कसे होणार हे आत्ताच सांगता येणार नाही. अजित पवार नेहमी सांगतात की मुख्यमंत्री होण्यासाठी १४५ ही मॅजिक फिगर गाठावी लागेल. एखाद्या पक्षाचे १४५ आमदार निवडून येत नाहीत, तोवर त्यांचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, हेसुद्धा तितकंच मोठं सत्य आहे. परंतु, अजित पवार हे त्यांच्या कर्तृत्वाने १४५ आमदार निवडून आणतील, याबाबतीत माझ्या मनात बिलकूल शंका नाही.