कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीवरुन महाविकास आघाडीत नाराजी नाट्य रंगल्याचं चित्र असताच शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर हे खासदार विनायक राऊत यांच्यासह विधानभवनात दाखल झाले होते. राजेश क्षीरसागर यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठकही झाली. या बैठकीत भाजपाविरुद्ध संपूर्ण ताकतीने लढण्याचा निर्धार झाला असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तसेच पोटनिवडणुकीत तिन्ही पक्ष मिळून भाजपाला पराभूत करण्याचा निर्धार देखील या बैठकीत झाला आहे. “उमेदवारी दिली नसल्याने मी नाराज नव्हतो तर स्थानिक शिवसैनिक नाराज होते. शिवसैनिकांची नाराजी मी लवकरच दूर करेन. कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे ही उमेदवारी सेनेला मिळावी अशी ईच्छा स्थानिक शिवसैनिकांची होती. परंतु महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा सर्वानुमते ठरलं होतं की जर एकादी जागा खाली झाली तर ज्या पक्षाला जागा मिळेल. त्यामुळे काँग्रेस या जागेवर लढणार असून आम्ही प्रचार करणार आहोत,” असे क्षीरसागर म्हणाले.

मी नाराज होण्याचे कारण नाही. मी २०१९ ला पराभूत होऊन देखील मला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष पद दिलं आहे, असे माजी आमदार राजेश क्षिरसागर म्हणाले.

विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, खासदार विनायक राऊत, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.

कोल्हापूर उत्तर विधानसभेचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं गेल्यावर्षी निधन झालं. त्यामुळे कोल्हापूर उत्तरची जागा ही गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून राज्य निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लगेच राजेश क्षीरसागर यांनी निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याचा निर्धार केला होता. पण शिवसेनेकडून कोल्हापूर उत्तरची जागा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसससाठी सोडली. त्यामुळे राजेश क्षीरसागर नाराज झाले होते.

राजेश क्षीरसागर हे गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात होते. त्यानंतर रविवारी कोल्हापुरात महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात देखील क्षीरसागर अनुपस्थितीत असल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajesh kshirsagar explanation after meet cm uddhav thackeray abn