राज्यात वाढत्या ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लादणार का? असा प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारला जात आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात मोठं विधान केलं आहे. “राज्यात सध्या कोणतेही नवीन निर्बंध लावले जाणार नाही,” असं स्पष्ट मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. तसेच केंद्र सरकारकडून ओमायक्रॉनमुळे ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणाला स्थगिती देण्यात आलीय. महाराष्ट्रात उड्डाणाबाबत केंद्र सांगेल त्या आदेशाची राज्यात अंमलबजावणी केली जाईल, असंही टोपे यांनी सांगितलं. ते जालन्यात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय औषध मानक तज्ज्ञ संस्थेची आज (१० डिसेंबर) बैठक आहे. या बैठकीतून आपल्याला लहान मुलांचं लसीकरण आणि बूस्टर डोस संदर्भात निर्णय होणं अपेक्षित आहे, असं मत राज्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी व्यक्त केलंय. फ्रंट लाईन वर्कर्सना बूस्टर देण्यासाठी या संस्थेने भूमिका घ्यावी, अशी मागणीही टोपे यांनी केली. या संस्थेच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यास तो स्वागतार्हच राहील, असंही टोपे यांनी सांगितलं.

“महाराष्ट्रात संक्रमित व्यक्तींकडून कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढलं”

परदेशातून राज्यात आलेल्यांचा शोध सुरू आहे. वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेऊन त्यांना शोधू आणि त्यांच्या चाचण्या करू. महाराष्ट्रात संक्रमित व्यक्तींकडून कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं आहे. याबाबत काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. मात्र, नागरिकांनी लसीकरण तातडीनं करून घ्यावे. कोरोना नियमांचं पालन करावे असंही ते म्हणाले.

“औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं मी समर्थन करत नाही”

औरंगाबादमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दुसऱ्या डोसचे लसीकरण केल्याची खात्री करूनच विद्यार्थी आणि शिक्षकांना महाविद्यालयात बसू द्या. अन्यथा बसू देऊ नका, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहे. या आदेशाचं मी समर्थन करत नाही. मात्र, लसीकरण ऐच्छिक जरी असलं तरी ते गरजेचं आहे.आज जरी हा निर्णय कायद्यात बसत नसला तरी ते गरजेचं आहे असंही टोपे यांनी म्हटलं आहे.

“परदेशातून आलेल्यांना शोधून जिनोमिक सिक्वेंसिंग चाचणी”

राज्यात सध्या कोरोना संक्रमित व्यक्तींना आपण विलीगिकरण करत आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची आपण ट्रॅकिंग, टेस्टिंग केली जात आहे. जे लोक २ महिन्यांपूर्वी राज्यात विदेशातून आलेले आहेत त्यांना शोधून त्यांचे नमुने जिनोमिक सिक्वेंसिंगसाठी पाठवले जात असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

“परदेशातून आलेल्या बेपत्ता प्रवाशांना शोधण्यासाठी वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेणार”

परदेशातून आलेले अनेक जण बेपत्ता झाले असून त्यांना शोधण्यासाठी मिशन मोडवर काम सुरू आहे. वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेतली जात असून कोणत्याही परिस्थितीत या लोकांना शोधून त्यांची टेस्ट केली जाणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. सांगलीत दक्षिण आफ्रिकेतून आलेला १ रुग्ण दगावला आहे. या रुग्णाचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र, त्याच्या चाचणीचा नमुना जिनोमिक सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आला आहे. याबाबत विचारलं असता याबाबत जिनोमिक सिक्वेंसिंग अहवाल आल्यानंतरच बोलता येईल अशी माहिती टोपे यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यातील मुंडेवाडी येथे आश्रमशाळेत १५ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या ठिकाणी जिनोमिक सिक्वेसिंग पूर्ण करून घेतलं जाईल. शिवाय अत्यावश्यक गोष्टी केल्या जातील अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा : राज्यात एकूण किती संशयितांची ओमायक्रॉन चाचणी? नागरिकांनी काय काळजी घ्यावी? राजेश टोपेंचं उत्तर

सोलापूर जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ५५ सरपंचांना लसीकरण करण्यात मदत करत नसल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. लसीकरणासाठी राज्यातील सरपंचांनी मदत करावी. त्यांच्या मदतीशिवाय लसीकरणाला वेग येणं शक्य नाही. ते गाव स्तरावर जबाबदार लोकप्रतिनिधी असतात. त्यामुळे राष्ट्रीय कामात ते मदत करत नसतील तर ते चुकीचं आहे. त्यामुळे त्यांनी सहकार्य करावं, असं आवाहन टोपे यांनी सरपंचांना केलंय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajesh tope important remark over new restriction amid omicron virus infection in maharashtra pbs
Show comments