आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षांतील गोंधळ संपत नसल्याचे चित्र आहे. यामुळे आता राज्याती राजकारण पुन्हा एकदा तापाताना दिसत आहे. विरोधी पक्ष भाजपाकडून ठाकरे सरकार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर टीका केली जात आहे. २४ ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांनी पसंती दिलेल्या केंद्राऐवजी दूरचे केंद्र, सकाळच्या सत्रातील परीक्षेसाठी एका जिल्ह्य़ातील आणि दुसऱ्या सत्रातील परीक्षेसाठी दुसऱ्याच जिल्ह्य़ातील केंद्र, परीक्षा शुल्क न भरलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र असे प्रकार समोर आले असून, परीक्षा पुढे ढकलूनही परीक्षा नियोजनातील गोंधळाबाबत उमेदवारांकडून तीव्र संताप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
“ एक दिवशी दोन परीक्षा, दोन सेंटर, दोन्ही काही मैलावर. ‘टोपे साहेब आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच’- आरोग्य विभागाच्या भरती परिक्षेत दुसऱ्यांदा गोंधळ झालाय. थोडी तरी लाज शिल्लक असेल तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा. नसेल तर मुख्यमंत्र्यांनी घ्यावा.” अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.
तसेच या संदर्भात ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत भातखळकर म्हणाले आहेत की, “सप्टेंबर महिन्यातील आरोग्य भरतीच्या वेळी नोकरभरतीमध्ये जो गोंधळ राजेश टोपे यांनी घातला. तोच गोंधळ आता पुढच्या रविवारी होणाऱ्या परीक्षेबाबत आहे. एकाच दिवशी दोन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रे ही १००-१०० किलोमीटर अंतरावर आहेत. टोपे साहेब आता या सगळ्या विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टरची सोय करून द्या. कारण, पुण्यातील मनुष्य वाशीमला कसा जाणार? आणि वाशीमची परीक्षा दिलेला परत पुण्याला कसा जाणार? सगळा भ्रष्टाचार, सगळा गोंधळ. आम्ही त्याच वेळी मागणी केली होती की या आयटी कंपनीचा परवाना तत्काळ रद्द करा. याचं आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांचं काय साटंलोटं आहे, त्याचा तपास करा. पण नेहमीप्रमाणेच मुख्यमंत्री ढिम्मं आपल्या घरात बसून आहेत. गेल्यावेळची नुकसानभरपाई तर विद्यार्थ्यांना मिळाली नाहीच. आता यावेळीची देखील परीक्षा पुढे ढकलण्याची नामुषकी या सरकारवर येणार आहे आणि त्यामुळे आता तरी राजेश टोपेंना आरोग्यमंत्री पदावरून तत्काळ हाकललं पाहिजे. या परीक्षा सुनियोजित पद्धतीने घेतल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे.”
“टोपे साहेब अभिनंदन, फॉर्म भरताना नागपूर, मात्र परीक्षेला सकाळी ठाणे आणि दुपारी वाशिम केंद्र दिलं”
आरोग्य विभागाच्या सहा हजार पदांसाठी राज्यभरातून तीन ते चार लाख उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. या सर्व उमेदवारांना या नियोजनातील गोंधळाचा फटका बसला आहे. यापूर्वी आरोग्य विभागाची परीक्षा नियोजनातील गोंधळामुळे रद्द करावी लागली होती. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी झाल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करून संबंधित ‘न्यासा’ कंपनीच्या कामाबाबत नाराजी प्रकट के ली होती. त्यानंतरही याच कं पनीद्वारे २४ ऑक्टोबर आणि ३१ ऑक्टोबरला परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार २४ ऑक्टोबरच्या परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करून दिल्यानंतर नियोजनात झालेला नवा गोंधळ लक्षात येऊन उमेदवार चक्रावून गेले आहेत.