मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याच्या प्रकरणांची एसआयटी चौकशी केली जाणार असल्याचं आज गृहमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भात एकीकडे फडणवीसांनी कुणी कुठे कशा वॉररूम चालवल्या होत्या, याची माहिती आमच्याकडे आहे, असंही विधान केलं असताना दुसरीकडे विधानपरिषदेत प्रवीण दरेकर यांनी थेट शरद पवार व राजेश टोपे यांची नावं घेतली. संगीता वानखेडे नामक महिलेनं हे आरोप केल्याचा दावा त्यांनी केला. या सर्व आरोपांना राजेश टोपे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं.
“जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आग्रही असतात, आहेत आणि होते. त्यामुळे कोण सत्तेत आहे किंवा नाही हे महत्त्वाचं ठरत नाही. त्यामुळे आम्ही विरोधात आहोत म्हणून हे आंदोलन होत नाहीये. जरांगे पाटलांनी स्वत:ही अनेकदा सांगितलंय की त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. मराठा आरक्षणासाठी ते काम करतायत”, असं राजेश टोपे म्हणाले.
“माणुसकी म्हणून आंदोलनस्थळी मदत पुरवली”
आंतरवली सराटीमध्ये माणुसकी म्हणून पाणी, चहापोहे वगैरे पुरवले, असं राजेश टोपे म्हणाले. “जर माझ्या भागात एखादं आंदोलन होतंय, त्या ठिकाणी लाखो लोक जमा होणार असतील तर माणुसकी म्हणून कुणीही तिथे मदत करतो. तहानलेल्याला पाणी द्या, भुकेल्यासाठी पोहे वगैरे ठेवा अशा काही गोष्टी मी केल्या. मी कोणत्याही समाजाचे मोर्चे किंवा आंदोलनं झाली, तेव्हा त्यांच्यासाठी मी काम केलं आहे”, असं ते म्हणाले.
“मनोज जरांगे पाटलांच्या संपर्कात आम्ही नाही. सरकारच त्यांच्याशी चर्चा करतंय. शिष्टमंडळासोबत स्थानिक आमदार म्हणून जाणं हा माझ्या कर्तव्याचा भाग आहे. त्यामुळे आज व्यक्त करण्यात आलेला संशय, आरोप धादांत खोटे आहेत. त्यात कोणतंही सत्य नाही. या लढ्याला वेगळं वळण लागण्याचं काम होऊ नये, एवढीच माझी इच्छा आहे”, अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
“होय, लाठीचार्च झाल्यानंतर आंतरवलीमध्ये गेलो होतो”
दरम्यान, आंतरवली सराटीमध्ये पहिल्यांदा लाठीचार्ज झाला, तेव्हा आपण तिथे गेलो होतो, असं टोपे म्हणाले. “लाठीचार्ज झाला तेव्हा मी तिथे गेलो. पण जखमींवर उपचार तातडीने व्हावेत हे पाहण्यासाठी गेलो होतो. तिथला लोकप्रतिनिधी म्हणून मी तिथे गेलो होतो. त्याशिवाय माझा तिथे जाण्यामागे दुसरा कोणताही हेतू नव्हता. आता एसआयटीमधून सत्य समोर येईलच. खरंतर अशा प्रश्नावर एसआयटी नेमायला हवी का? हाही प्रश्न आहे”, असंही राजेश टोपेंनी नमूद केलं.
“…तर राजकारणातून संन्यास घेईन”
“जर यात मी भावना भडकवण्याच्या प्रयत्नात एक टक्काही दोषी असेन, तरी महाराष्ट्राच्या जनतेनं काहीही शिक्षा दिली तरी भोगायला तयार राहीन. राजकारणातून संन्यास घेईन. मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी आमचीही मागणी आहे. त्याच भावनेनं आमचं आंदोलनाला समर्थन आहे”, असंही ते म्हणाले.
“आंतरवली सराटीपासून पाच किलोमीटरवर कारखाना आहे. त्या छोट्या गावात कुणाला राहायला जागा नसेल तर लोक तिथे जाऊन थांबायचे. माध्यमाचे लोकही तिथे जाऊन थांबायचे. मुख्यमंत्री त्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांचं हेलिकॉप्टरही कारखान्याच्याच हेलिपॅडवर उतरलं. मग असं म्हणायचं का की ते कारखान्याच्या हेलिपॅडवर उतरले म्हणजे त्याचा काहीतरी वेगळा अर्थ आहे?” असा सवाल राजेश टोपे यांनी त्यांच्यावरील आरोपांबाबत उपस्थित केला आहे.