पाठपुराव्यानंतरही मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्षच
खनिज रॉयल्टी, वनहक्क जमिनीचे पट्टे, शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेला धानाच्या बोनस वाटपात दिरंगाई, पुनर्वसन अनुदान निधी, रखडलेले सिंचन प्रकल्पाचे प्रश्न, रस्ते दुरुस्ती निधी आदी मागण्यांसाठी शासन व प्रशासन वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करीत आहे. शासनाचे या मागण्यांकडे लक्ष वेधून त्या पूर्ण करण्यासाठी काल, १७ फेब्रुवारीपासून अर्जुनी मोरगावचे आमदार राजकुमार बडोले हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणावर बसले.
गोंदिया जिल्ह्य़ाला यंदा अतिवृष्टी व पूरपरिस्थितीचा मोठा फटका बसला. या अतिवृष्टीमुळे धानपिकांसह जिल्ह्य़ातील रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, पावसाळा संपून ही या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पुरेसा निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून रस्त्यांवरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचा फटका वाहनधारक व नागरिकांना बसत आहे. जिल्ह्य़ातील कलपाथरी व कटंगी प्रकल्पग्रस्तांचा पुनवर्सन व अनुदानाचा मुद्यावरही शासन वेळकाढूपणा करीत आहे. परिणामी, हे प्रकल्पग्रस्त देशोधडीला लागले आहेत. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानालगतच्या कालीमाटी, कवलेवाडा व झलकारगोंदी या गावातील नागरिकांचे सौंदडजवळील श्रीरामनगर येथे पुनवर्सन करण्यात आले. मात्र, श्रीरामनगर येथे आजही वीज, पाणी, रस्ते आदी मुलभूत सोयी पोहोचलेल्या नाही. परिणामी, या पुनवर्सनग्रस्तांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून ते जंगलातील पूर्वीच्या गावी राहणे पसंत करीत आहेत.
जिल्ह्य़ातील अनेक लाभार्थी शेतकऱ्यांना वनहक्क जमिनीचे पट्टे देण्यात आलेले नाहीत, तर ज्यांना देण्यात आलेले आहेत त्यांची नावे सातबारा उताऱ्यावर चढविण्यात आलेले नाही. त्यामुळे हे लाभार्थी शेतकरी शासनाने दिलेल्या हक्कापासून दुरावले आहेत. तसेच जिल्ह्य़ातील मुरूम, गिट्टी, बोल्डर व विटांची रॉयल्टीच्या मागणीवरही शासन वेळकाढूपणा करीत आहे. या मागणीसाठी आजवर अनेकदा शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्या पाठपुराव्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मागण्याचे गांभीर्य शासन व प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासह मागण्या पूर्ण करून देण्यासाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनात आमदार बडोले यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेतराम कटरे, माजी सभापती उमाकांत ढेंगे, भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, शिवसेना प्रमुख मुकेश शिवहरे, जिल्हा परिषद उपाध्याक्ष मदन पटले, सदस्य राजेश चांदेवार, दिलीप गौतम, दामोदर नेवारे, सदस्य रूपाली टेंभुर्णे, सभापती तानेश ताराम, उपसभापती पोमेश्वर रामटेके, जिल्हा परिषद सभापती प्रकाश गहाणे, कुसन घासले, श्रावण राणा, मधुकर मरसकोल्हे आदी पदाधिकारी मोठय़ा संख्येने भाजप कार्यकत्रे सहभागी झालेले आहेत.

Story img Loader