पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर असतानाच केंद्रातील वजनदार मंत्र्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्याचा सपाटा सुरू केला असून, मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा विश्वासात घेत नाहीत, अशी तक्रार या मंत्र्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र या संदर्भात संघाकडून कुणीही मतप्रदर्शन करायला तयार नसले तरी मंत्र्यांच्या नाराजीची चर्चा मात्र संघवर्तुळात सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनसह तीन देशांच्या दौऱ्यावर जाताच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची पावले येथील संघ मुख्यालयाकडे वळली. राज्यातील नक्षलवादाचा आढावा घेण्याचे निमित्त साधून येथे आलेल्या राजनाथ सिंहांनी मोहन भागवतांशी तब्बल एक तास गुप्त चर्चा केली. या वेळी त्यांनी मोदी व शहा यांच्या कार्यपद्धतीवर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्याचे समजते. महत्त्वाचे निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेतले जात नाही. नुकतेच काही राज्यांचे राज्यपाल नेमण्यात आले. हा विषय गृहखात्याशी संबंधित असतानासुद्धा साधे मतही विचारात घेण्यात आले नाही, अशा शब्दात सिंह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्याची माहिती मिळते आहे. संघाच्या आदेशावरून पक्षाध्यक्षपद सोडून सरकारमध्ये सामील झालो, आता घुसमट होत असल्याने संघानेच योग्य तो निर्णय घ्यावा, अशी निर्वाणीची भाषा सिंह यांनी वापरल्याची माहिती सूत्रांनी दिली. राजनाथ सिंह यांची नाराजी पाहिल्यानंतर संघाच्या वर्तुळातून तातडीने अमित शहा यांना निरोप देऊन बोलावून घेण्यात आले व अशी नाराजी उद्भवणार नाही याची काळजी घ्या, असे सांगण्यात आले.
सिंह यांच्या पाठोपाठ केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनीही सरसंघचालकांची रविवारी भेट घेतली. त्यांनीही महत्त्वाचे निर्णय घेताना डावलण्यात येते, असा सूर लावल्याचे समजते. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले होते. तेथे त्यांनी संरक्षणविषयक महत्त्वाचे करार केले. संरक्षणसिद्धतेसाठी आवश्यक असलेल्या राफेलविमानाच्या खरेदीचा करारसुद्धा या वेळी झाला. अशा महत्त्वाच्या क्षणी देशाचे संरक्षणमंत्रीच हजर नव्हते. मोदींनी त्यांना सोबत नेलेच नाही. कुणाला सोबत न्यावे, हा पंतप्रधानांचा अधिकार असला तरी यातून चांगले चित्र जगासमोर जात नाही, अशा शब्दात पर्रिकर यांनी संघ मुख्यालयात नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. पंतप्रधान परदेश दौरे करतात आणि परराष्ट्रमंत्री देशात राहतात, अशी टीका सध्या सहन करावी लागत आहे, अशी भावना या दोन्ही मंत्र्यांनी भेटीत बोलून दाखवल्याचे समजते. ज्येष्ठ मंत्र्यांच्या या भेटीच्या संदर्भात संघाकडून कुणीही मतप्रदर्शन करायला तयार नसले तरी या मंत्र्यांच्या नाराजीची चर्चा मात्र संघवर्तुळात सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दौरा पूर्वनियोजित -पर्रिकर
रविवार व सोमवार, असे दोन दिवस विदर्भात असलेल्या पर्रिकरांना या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता माझा दौरा आधीच ठरला होता व येथे आल्यावर संघाचा स्वयंसेवक या नात्याने भागवतांची भेट घेणे स्वाभाविक आहे, असे ते म्हणाले.

दौरा पूर्वनियोजित -पर्रिकर
रविवार व सोमवार, असे दोन दिवस विदर्भात असलेल्या पर्रिकरांना या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता माझा दौरा आधीच ठरला होता व येथे आल्यावर संघाचा स्वयंसेवक या नात्याने भागवतांची भेट घेणे स्वाभाविक आहे, असे ते म्हणाले.