देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संभाजीनगर येथे आयोजित महाराणा प्रताप यांच्या सन्मानार्थ आयोजित एका कार्यक्रमात केलेल्या भाषणादरम्यान मोदी सरकार आणि भारतीय सैन्याचं कौतुक केलं. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले, हलदी घाटमध्ये महाराणा प्रताप होते, आता गलवान घाटात भारतीय सैन्य आहे. युद्ध कोणतंही असो भारत कधीच झुकला नाही आणि झुकणारही नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
राजनाथ सिंह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी बातचित केली. जेव्हा जेव्हा आवश्यकता होती तेव्हा त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशीही चर्चा केली. युक्रेनमध्ये अडकलेले २२,००० हून अधिक भारतीय विद्यार्थी मायदेशी परतावेत म्हणून युद्ध काही काळासाठी थांबवण्यात आलं होतं. या विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्या मुलांना तिथून बाहेर काढावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (पीएम नरेंद्र मोदी) यांना विनंती करत होते.
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित वीर शिरोमणी महाराणा प्रताप महासंमेलनाला संबोधित करताना संरक्षणंत्री राजनाथ सिंह म्हणाले, मला अभिमान आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढलं. यावेळी महाराणा प्रताप यांचा उल्लेख करत सिंह म्हणाले महाराणा प्रताप यांनी गवताच्या भाकऱ्या खाल्ल्या, परंतु स्वाभिमानाशी कधीही तडजोड केली नाही.
हे ही वाचा >> “उद्धव ठाकरेंबाबतची ती गोष्ट खटकली”, शंभूराज देसाईंनी व्यक्त केली खंत; म्हणाले, “महाविकास आघाडीच्या बैठकीत त्यांना…”
राजनाथ सिंह म्हणाले, तुम्हाला जर महाराणा प्रताप यांचं समर्पण समजलं, त्यांचा पराक्रम समजला तर तुम्ही त्या काळाला मुघलांचा काळ नव्हे तर महाराणा प्रताप यांचा काळ असं संबोधित कराल. महाराणा प्रताप अकबरासमोर कधीच झुकले नाहीत. त्यांनी मेवाडला कायम अजेय ठेवलं. हलदी घाट असो वा गलवान खोरं, भारताचं शीर नेहमीच ताठ राहिलं आहे, भविष्यातही तसंच राहील.