प्राप्तिकर खात्याच्या कामकाजात हस्तक्षेप करावयाचा नितीन गडकरी यांचा हेतू नसून त्यांच्या ‘त्या’ वक्तव्यामागील भावना समजून घ्यायला हव्यात, असे मत भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त अध्यक्ष राजनाथसिंह यांनी व्यक्त केले. रेशीमबागेतील स्मृती भवनात सोमवारी सायंकाळी भेट दिल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
कायद्याला त्याचे काम करू द्या, कायदेशीर बाबीत हस्तक्षेप करावयाचा भाजपचा कुठलाही इरादा नाही. मात्र, गडकरींच्याही भावना संबंधितांनी समजून घ्यायल्या हव्यात, असे राजनाथसिंह म्हणाले. यशवंत सिन्हा यांनी मोदींसदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले असता, ते काय बोलले, हे मला माहिती नाही. दिल्लीत गेल्यावर जाणून घेतल्यानंतरच बोलता येईल, असे राजनाथसिंह म्हणाले.
देश सध्या संक्रमणात्मक परिस्थितीतून जात असून देशासमोरील समस्यांची सर्वानाच जाण आहे. केंद्र सरकार विफल झाले आहे. असा परिस्थितीत देळातील जनता भाजपकडे आशेने डोळे लावून बसली आहे. त्यामुळे संपूर्ण समर्पणाने भाजप उंचावण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने योगदान द्यायला हवे, असे ते म्हणाले.
नितीन गडकरी यांनी खूप चांगले काम केले आहे. दुर्दैवाने विपरीत परिस्थितीत त्यांना राजीनामा द्यावा लागला. पक्षाने माझ्यावर जबाबदारी सोपविली. त्यामुळे तुमचे सहकार्य  हवे, असे आवाहन राजनाथसिंह यांनी याप्रसंगी कार्यकर्त्यांना केले.
स्मृती भवनातील संघ संस्थापक डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळावर राजनाथसिंह यांनी फुले वाहून दर्शन घेतले. त्यानंतर स्थानिक नेते व कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा