चार राज्यात भाजपला मिळालेले यश आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह २६ डिसेंबरला नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेणार आहेत. शिवाय, याच वेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण, छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा शिंदेही सरसंघचालकांच्या भेटीला येण्याची शक्यता असून त्यांचा अधिकृत कुठलाही कार्यक्रम आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर आता सगळ्यांचे लक्ष लोकसभा निवडणुकीकडे लागले आहे. सध्या देशभरात मोदींचा झंझावात सुरू असून त्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे चारही राज्यात भाजपाला चांगले यश मिळाले आहे. फेब्रुवारीत लोकसभा निवडणुका घोषित होण्याची शक्यता बघता भाजपने तयारी सुरू केली. या पाश्र्वभूमीवर राजनाथसिंह नागपुरात संघ कार्यालयात येणार असून ते डॉ. भागवतांशी चर्चा करणार आहेत.

Story img Loader