काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी महाराष्ट्रातून रजनी पाटील यांचं नाव जाहीर झाल्याने चर्चांना पूर्णविराम लागला आहे. या जागेसाठी ४ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. रिक्त झालेल्या जागेसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रजनी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. रजनी पाटील यांचं नाव राज्यपाला नियुक्त १२ आमदारांच्या यादीत आहे. पण गेल्या वर्षभरापासून उमेदवारी रखडल्याने त्यांचं नाव राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलं आहे. यापूर्वीही विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.
रजनी पाटील या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. सध्या जम्मू आणि काश्मीरच्या काँग्रेसच्या प्रभारी आहेत. याआधीही त्या राज्यसभेवर होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा पक्षाने त्यांना संधी दिली आहे. १९९६ साली त्या बीडमधून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. रजनी पाटील या वसंतदादा पाटील यांच्या मानसकन्या असून मूळच्या सांगली जिल्ह्यातल्या आहेत. विवाहानंतर त्या मराठवाड्यात स्थायिक झाल्या. माजी क्रीडा राज्यमंत्री अशोक पाटील यांच्या त्या पत्नी आहेत.
राजीव सातव यांचं १६ मे रोजी करोनामुळे निधन झालं होतं. त्यांच्या निधनामुळे राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. भाजपाकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता भाजपा शेवटच्या क्षणी उमेदवार मागे घेऊन, निवडणूक बिनविरोध करणार का ? हे बघणे महत्त्वाचे ठरेल.