Kunal Kamra Controversy: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या गाण्यात कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांचा आक्षेपार्ह उल्लेख केल्याचा आरोप आहे. कामराचे हे गाणे व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी खार येथील युनिकॉन्टिनेंटल स्टुडिओवर हल्ला केला आणि तोडफोड केली. या घटनेनंतर कामरा यांच्याविरोधात अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान कुणाल कामराच्या या गाण्यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भाजपाच्या नेत्यांनी या प्रकरणी टीका केली आहे. तर शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि इतर विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनी कुणाल कामराचे समर्थन केले आहे. अशात आता मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एक्सवर कुणाल कामराच्या एका गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये कामराने वाहतूक कोंडींच्या प्रश्नावर गाणे गायले आहे.

धन्यवाद कुणाल कामरा…

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी नुकताच एक्सवर कुणाल कामराच्या वाहतूक कोंडीवरली विडंबनात्मक गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओबरोबर त्यांनी, “धन्यवाद कुणाल कामरा, आम्हा डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडल्याबद्दल!”, अशी एका ओळीची पोस्ट केली आहे.

बिल्डरांची मेट्रो आणि टक्केवारी

माजी आमदार राजू पाटील यांनी यावेळी बिल्डरांची मेट्रो आणि टक्केवारी असे दोन हॅशटॅगही वापरले आहेत. दरम्यान राजू पाटलांच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

कुणाल कामरा एकनाथ शिंदे वाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कामरा याच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. त्यांनी कामराने माफी मागावी अशी मागणी केली आहे. दुसरीकडे, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी कामराला सहानुभूती दर्शवली असून, त्यांच्यावर कारवाई का करावी, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनीही काल कुणाल कामराला आव्हान देत, “जर त्याला एकनाथ शिंदेंविषयी काही बोलायचे असेल तर त्याने मुंबई, रत्नागिरी किंवा कोल्हापूरात येऊन बोलावे”, असे म्हटले आहे.

कुणाल कामराचा माफी मागण्यास नकार

या प्रकरणी, मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी समन्स बजावले होते, परंतु तो पोलिसांसमोह अद्याप हजर झालेला नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात दुसरे समन्स बजावण्यात आले आहे. कामराने या प्रकरणात माफी मागण्यास नकार दिला असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या तो मुद्द्यावर ठाम आहे.