भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे गुन्हे दाखल झाले आहेत. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “शाईफेकीचे समर्थन करणे चुकीचे आहे, पण शाई फेकणाऱ्या युवकावर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते पाहता सरकार तालिबानींसारखे वागू लागले आहे असे वाटते,” अशी प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिली. त्यांनी रविवारी (११ डिसेंबर) फेसबूकवर पोस्ट करत आपली भूमिका मांडली.
राजू शेट्टी म्हणाले, “शाईफेकीचे समर्थन करणे चुकीचे आहे, पण शाई फेकणाऱ्या युवकावर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते पाहता सरकार तालिबानींसारखे वागू लागले आहे असे वाटते. ३०७ म्हणजे धारदार शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न आणि ३५३ म्हणजे सरकारी कामात अडथळा याचा अर्थ महापुरुषांचा अपमान करणे हे सरकारी काम आहे का?”
“सरकारने ७०० हून अधिक शेतकऱ्यांचा बळी घेतला, त्यांच्यावर ३०२ कलम का लावले नाही?”
“मग हा कायदा दिल्लीतील शेतकरी आंदोलनात ज्या सरकारने ७०० हून अधिक शेतकऱ्यांचा बळी घेतला त्याला जबाबदार असणाऱ्यांवर ३०२ सह ही कलमे का लावण्यात आले नाहीत?” असा प्रश्न राजू शेट्टींनी विचारला.
हेही वाचा : Video: पुण्यात चंद्रकांत पाटलांवर शाईफेक; ‘बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ची घोषणाबाजी करत फेकली शाई
“शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करणे अतिरेकीपणा”
मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकील असिम सरोदे यांनीही या प्रकरणी ट्वीट करत मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “शाईफेक प्रकरणात कलम ३०७ म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि १२० ब, शस्त्रास्त्र कायद्याचा वापर करणे यानुसार गुन्हा दाखल करणे अतिरेकीपणा आहे.”
हेही वाचा : Photos : “शिंदे-फडणवीसांना हात जोडून विनंती आहे की…”, शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
“आरोपींचा खटला मोफत चालवणार”
“यंत्रणांच्या मदतीने कायद्याच्या गैरवापराचे हे उदाहरण आहे. त्यामुळे आमची कायदेशीर टीम आरोपींची केस मोफत चालवेल. परंतु, शाईफेकीचा व बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध,” असंही असीम सरोदे यांनी नमूद केलं.