महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन प्रमुख गट पाहायला मिळत आहेत. महायुतीत भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचा शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजित पवार गट, प्रहार जनशक्ती पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासह (आठवले गट) इतर काही लहान पक्ष आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार गट, काँग्रेससह इतर लहान पक्षांचा समावेश आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कम्युनिस्ट पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसारखे काही पक्ष आहेत जे महायुती किंवा महाविकास आघाडीत सहभागी झालेले नाहीत. या पक्षांना सातत्याने तुम्ही कोणत्या आघाडीत जाणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काही वेळापूर्वी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचित केली. यावेळी शेट्टी यांना विचारण्यात आलं की, तुम्ही विरोधकांनी नव्याने बनवलेल्या इंडिया (INDIA) आघाडीत सहभागी होणार आहात का? त्यावर शेट्टी यांनी ‘नाही’ असं स्पष्ट उत्तर दिलं. तसेच ते म्हणाले, आमचा आधीपासूनच प्रागतिक विकास मंच आहे, जो गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. यात असणाऱ्या छोट्या पक्षांना चळवळीची पार्श्वभूमी आहे.
राजू शेट्टी म्हणाले, सरकार कोणाचंही असो, आम्ही (प्रागतिक विकास मंचाशी संबंधित छोटे पक्ष) चळवळीच्या माध्यमातून जे प्रश्न मांडतो, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. आमचा हा स्वतंत्र मंच आहे. या माध्यमातून राज्य सरकारवर आणि सरकारच्या धोरणांवर अंकूश ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. महाविकास आघाडी झाली तोव्हा आमचा सुरुवातीला त्यांना पाठिंबा होता. परंतु, आमचा स्वतंत्र मंच आहे.
हे ही वाचा >> माफी मागत जितेंद्र आव्हाड अज्ञातस्थळी, फोनही बंद; कारण काय? वाचा…
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडीत आम्हाला वाईट अनुभव आल्यानंतर इथून पुढे काय निर्णय घ्यायचे, कशा पद्धतीने वाटचाल करायची? यासंदर्भात आगामी काळात निर्णय घेतले जातील. कारण आम्ही प्रश्नांसाठी संघर्ष करणारे आणि निवडणुका लढवणारे छोटे पक्ष आहोत. यासाठी आम्ही आमचं स्वतंत्र व्यासपीठ तयार केलं आहे. आम्ही सगळेजण मिळून निर्णय घेऊ.