स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोठा निर्णय घेत आघाडीला झटका दिला आहे. यानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे. राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये संघटनेच्या राज्यकार्यकारणी बैठकीत ही घोषणा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे राज्य प्रवक्ता रणजित बागल म्हणाले, “स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे. राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये याबाबत घोषणा केली. त्यामुळे आता आम्ही स्वतंत्र आहोत.”

“राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या यादीतून माझं नाव वगळा”

विशेष म्हणजे आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजू शेट्टी यांनी राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या यादीतून माझं नाव वगळा, अशी मागणी करणार आहेत. यासाठी राजू शेट्टींनी राज्यपालांकडे भेटीसाठी वेळही मागितली आहे.

दरम्यान, राजू शेट्टी यांनी याआधीच मविआतून बाहेर पडण्याचा सूचक इशारा दिला होता. “महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सामुदायिक निर्णय होता. येत्या ५ एप्रिलला राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा केल्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल,” या शब्दांमध्ये राजू शेट्टीं यांनी महाविकास आघाडी सोडण्याबाबत शुक्रवारी (१ एप्रिल) सूचक इशारा दिला होता.

‘आघाडीला स्वाभिमानीचे अनेक वर्षांचे नैतिक अधिष्ठान हवे होते”

राजू शेट्टी म्हणाले होते, “आघाडी सरकारचा सभागृह नेता म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड करताना सूचक म्हणून माझे नाव घेतले होते. कारण त्यांना स्वाभिमानीने अनेक वर्षांपासून जपलेले नैतिक अधिष्ठान हवे होते.” स्वाभिमानीने पाठिंबा काढल्यामुळे राज्य सरकारच्या स्थैर्याला फारसा धक्का लागणार नसला, तरी आघाडीतील एक मित्रपक्ष नाराज होऊन बाहेर पडला, तर जनमतावर परिणाम होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जाते.

संवादाचा अभाव

आघाडी सरकारला अडीच वर्ष होत आली तरी ज्या किमान समान कार्यक्रमावर आघाडी अस्तित्वात आली त्याचे पुढे काहीच झाले नाही. नवीन धोरण राबवत असताना मित्रपक्षांना विचारले जात नाही. आघाडी सरकारचं समीक्षण करण्याची आता वेळ आली आहे, असे शेट्टी म्हणाले होते.

हेही वाचा : राज्यपाल सध्या कामात आहेत, सवड मिळाल्यावर सही करतील -राजू शेट्टी

नवे समीकरण ?

महाविकास आघाडीच्या कारभाराला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे कंटाळले आहेत. याबाबत भाजपाची कोणती भूमिका राहील? या प्रश्नावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांचे स्वागतच केले जाईल, असे उत्तर दिले. तर कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी राजू शेट्टी यांनी भाजपाला पाठिंबा द्यावा यासाठी पदाधिकाऱ्यांनी जयसिंगपूर येथे त्यांची भेट घेतली. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे आदींचा समावेश होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju shetti big decision announce to left mva in kolhapur meeting pbs