आगामी काळात कर्जमाफी नकोय, पण कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून कर्जमुक्ती द्यावी. याकरिता लवकरच दिल्ली येथे एका अभ्याससत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी येथे दिली. आमदार सदाभाऊ खोत यांची विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर पंढरपुरात सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले,‘एकनाथ खडसे यांनी चौकशी करा, असे सांगत स्वेच्छेने राजीनामा दिला आहे, त्यामुळे यात बहुजन कार्यकर्त्यांवर अन्याय करण्याचा प्रश्नच येत नाही आणि तसेच जर सरकारला करायचे असते तर सदाभाऊ खोत, दरेकर, मेटे यांना विधान परिषदेवर घेतलेच नसते, त्यामुळे ही चर्चा निष्फळ आहे.’ शेट्टी म्हणाले,‘ देशातून कर्ज बुडवून विजय मल्या पळून जातो, मात्र आमच्या शेतकऱ्याकडून कर्ज वसूल केले जाते, त्यामुळे आम्हाला आगामी काळात कर्जमाफी नको आहे. पण, कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून कर्जमुक्ती हवी आहे.

Story img Loader