लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला तब्बल ३० जागा मिळवण्यात यश आलं. तर महायुतीला १७ जागा मिळाल्या. असं असलं तरी लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. यामध्ये कोल्हापूरच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचाही मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. हातकणंगले मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील सरुडकर अशी तिरंगी लढत झाली होती. या तिरंगी लढतीत धैर्यशील माने यांचा विजय झाला तर राजू शेट्टी यांचा पराभव झाला. या पराभवानंतर आता राजू शेट्टींनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्याला फसवलं असल्याचा आरोप केला आहे.
राजू शेट्टी काय म्हणाले?
“मला तेव्हा सागण्यात आलं होतं की, आम्ही तुम्हाला पाठिंबा दिल्यानंतर आणि तुम्ही निवडून आल्यानंतर काय भूमिका घेणार? याबाबत काही ड्राप्ट तयार करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते सतेज (बंटी) पाटील यांनी तो ड्राप्ट तयार केला होता. मात्र, नंतर त्यांनी त्यांचा उमेदवार जाहीर केला”, असं राजू शेट्टी यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं.
शेट्टी पुढे म्हणाले, “निश्चितच विश्वासघात केला. कारण गेल्या सहा महिन्यांपासून ही जागा आम्हाला सोडली असं ते सांगत होते. त्यांना वाटत होतं की मी (राजू शेट्टी) उमेदवार आहे. त्यामुळे उमेदवाराने महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यांना भेटलं पाहिजे. त्यानंतर मी उद्धव ठाकरे यांना दोनदा भेटलो. तसेच कोल्हापूरातील काँग्रेसचे नेते सतेज (बंटी) पाटील यांना भेटलो. तसेच शरद पवार यांच्याबरोबरही मी फोनवरून चर्चा केली होती. मात्र, या सर्वांनी मिळून शेवटी जे करायचं तेच केलं”, असा हल्लाबोल राजू शेट्टी यांनी केला आहे.
हेही वाचा : भविष्यात एनडीएबरोबर जाणार का? उद्धव ठाकरेंचं मोजक्या शब्दांत उत्तर; म्हणाले, “समजा मला जायचं…”
पराभवानंतर राजू शेट्टींची भावनिक पोस्ट
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. पराभव झाल्यानंतर राजू शेट्टींनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर करत शेतकऱ्यांना काही सवाल केले होते. राजू शेट्टींनी म्हटलं होतं की, “माझं काय चुकलं! प्रामाणिक असणं हा गुन्हा आहे का? शेतकऱ्यांनो तुम्हीही…”, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर सदाभाऊ खोत यांनी टीका केली होती.
सदाभाऊ खोत यांनी काय टीका केली होती?
“राजू शेट्टींमध्ये प्रचंड अहंकार आला होता. चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना खड्यासारखं बाजूला करायचं, त्यांना अपमानजनक वागणूक द्यायची. त्यांच्याविरोधात षडयंत्र रचायचं, बदनाम करायचं. कट कारस्थान करायचं, हे असं केल्यामुळे जीवाभावाचे लढणारे कार्यकर्ते त्यांच्यापासून लांब गेले. मी काय गुन्हा केला? असं ते म्हणाले, पण त्यांनी अनेक गुन्हे केले आहेत. आंदोलन करताना आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात चळवळ उभा केली. मात्र, भारतीय जनता पक्षाबरोबर युती असताना स्वत:च्या स्वार्थासाठी युती तोडून प्रस्थापितांच्या मांडीला मांडी लावून बसले. त्यानंतर शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले. नंतर बाजूला झाले. त्यानंतर स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची भूमिका घेतली”, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती.