स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजू शेट्टी पुन्हा महाविकास आघाडीशी युती करणार का? या चर्चांना उधाण आलं होतं. पण, भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राजू शेट्टींनी स्पष्टीकरण दिलं आहे.
राजू शेट्टी म्हणाले, “उद्धव ठाकरेंशी भेट राजकीय नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी घेतली आहे. उद्धव ठाकरेंनी अडाणी उद्योग समूहाविरोधात लढाई सुरू केली आहे. आम्हालाही अडाणींचा त्रास होत आहे. केंद्र सरकारनं अडाणींवरील प्रेमापोटी खाद्यतेलाचं आयतशुल्क ५ टक्के कमी केल्यानं सोयाबीनला भाव नाही आहे. २००० साली सोयाबीनचा ४००० हजार रूपये असलेला दर २४ वर्षानंतरही तेवढाच आहे. याचं कारण बाहेरील देशांतून मोठ्या प्रमाणत कच्चे तेल आयात करण्यात आलं आहे.”
हेही वाचा : “तुपकर स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवत असतील तर चांगलंच आहे, पण…”, राजू शेट्टीचं विधान
“…तरच पाणी वाचणार आहे”
“कोल्हापुरातील वेदगंगा नदीवर पाटगाव येथे धरण आहे. त्यातील पाणी अदाणी उद्योग समूह आठ हजार चारशे कोटी रूपये खर्च करून सिंधुदुर्ग येथे नेणार आहे. त्यातून २१०० मेगावॅटची वीज निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सीमाभागातील शेतीला पाण्याचा तुटवडा जाणवू शकतो. याविरोधात आंदोलन सुरू करत आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी अडाणीविरोधात लढा उभा केला, तरच पाणी वाचणार आहे. या शेतकऱ्यांच्या लढ्याला शिवसेनेचा पाठिंबा मिळण्यासाठी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे,” असं शेट्टींनी सांगितलं.
“महाविकास आघाडीशी काहीही देणं-घेणं नाही”
उद्धव ठाकरेंबरोबर भेटीत जागा वाटपाबाबत चर्चा झाली का? असा प्रश्न प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधिनं विचारल्यावर राजू शेट्टींनी म्हटलं, “यासंदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीत जाण्याचा कुठलाही विचार नाही. आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहोत. महाविकास आघाडीशी काहीही देणं-घेणं नाही.”
“…म्हणून महाविकास आघाडीशी फारकत घेतली”
“महाविकास आघाडी सरकारनं कारखानदारांना पूरक असं एफआरपीचं तुकडे करणं आणि भूमी अधिग्रह कायद्यात मोडतोड करून त्यात दुरूस्ती करणं, असे दोन निर्णय घेतले. हे आमचे आक्षेपाचे मुद्दे आहेत. म्हणून महाविकास आघाडीशी फारकत घेतली आहे. याबाबत स्पष्टीकरण मिळत नाही, तोपर्यंत महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही,” असं शेट्टींनी स्पष्ट केलं.
हेही वाचा : जयंत पाटील यांच्या विरोधात अजितदादांची राजू शेट्टी यांना ताकद ?
“दोन वर्षापासून लोकसभेची तयारी सुरू”
“स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे ६ जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार आहे. यासाठी दोन वर्षापासून आमची तयारी सुरू आहे,” असंही राजू शेट्टी म्हणाले.