आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील विविध पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीए विरुद्ध विरोधकांची इंडिया आघाडी असा सामना रंगू शकतो. हीच परिस्थिती राज्यातही दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. हे दोन गट निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. परंतु, राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यासारखे काही पक्ष आहेत ज्यांनी महाविकास आघाडी किंवा महायुतीत प्रवेश केलेला नाही. दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडीतल्या मोठ्या पक्षांनी या छोट्या पक्षांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीत सहभागी होईल अशी चर्चा सुरू आहे. यावर स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
राजू शेट्टी यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की, इंडिया आघाडीची बैठक उद्या मुंबईत होणार आहे. तुम्ही या बैठकीकडे कसे पाहता? यावर राजू शेट्टी म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गेल्या आठवड्यात मला फोन आला होता. परंतु, मी त्यांना सांगितलं की आमच्या संघटनेचा अजून काही निर्णय झालेला नाही.
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, खरंतर एप्रिल २०२१ मध्येच आम्ही महाविकास आघाडीशी सगळे संबंध तोडले होते. ऊसाला तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळणारा एफआरपी, भूमी अधिग्रहण कायद्यात केलेली मोडतोड हे महाविकास आघाडीचे निर्णय शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक होते. त्यामुळे आम्ही आमचा आक्षेप नोंदवून महाविकास आघाडीशी संबंध तोडले. आम्ही मविआमधून बाहेर पडल्यावर आमचं म्हणणं काय आहे याची साधी चौकशीसुद्धा त्यांना कराविशी वाटली नाही, आणि आज अचानक आम्ही ‘इंडिया’त सहभागी होणार हे परस्पर सांगणं किंवा निमंत्रण देणं याचा अर्थ आम्हाला गृहित धरलं जात आहे.
हे ही वाचा >> “अजित पवार गटाला त्यांची जागा…”, मविआच्या बैठकीतून शरद पवारांचा इशारा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले, आम्ही फरपटत जाण्यासाठी निवडणूक लढत नाही, आम्ही मुद्दयांवर आधारित आणि शेतकरी प्रश्नांवर राजकारण करतो. जिथे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्याची हमी मिळत नाही, तिथे आम्ही नसतो.