Raju Shetti On Loan Waiver of Farmers : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार सत्तेत येऊन जवळपास चार महिने झाले आहेत. मात्र, महायुतीच्या नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही होताना पाहायला मिळत नाही. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर ही घोषणा आता हवेतच विरल्याचं पाहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा लागलेली असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल की नाही? याबाबत स्पष्ट सांगितलं.शेतकऱ्यांनी आपआपले कर्ज भरण्याचे सूतोवाच अजित पवार यांनी केले. दरम्यान, यावरूनच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी हे आक्रमक झाले आहेत. ‘महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा मंत्रिमंडळातील मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही’, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
राजू शेट्टी काय म्हणाले?
“महायुतीने शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं आश्वान दिलं. पण आता अजित पवारांनी सांगितलं कर्जाचे पैसे भरा. या क्षणाला अनेक शेतकरी थकबाकीदार आहेत. त्या शेतकऱ्यांना बँकांनी नोटीस काढल्या आहेत. यावरून राज्यातील शेतकऱ्यांची आवस्था काय आहे हे लक्षात येतं. खरं तर लोकांनी शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान केलं आहे. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका देखील अडचणीत आलेल्या आहेत. आता कर्ज माफ झालं नाही म्हणून शेतकऱ्यांना एकीकडे जप्तीच्या नोटीसा येत आहेत”, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
“दुसरीकडे वेळेत कर्ज न भरल्याप्रकरणी व्याज सवलत मिळत नाही. तसेच त्या शेतकऱ्यांचा समावेश थकबाकीदारांमध्ये होतो. तसेच शेतकऱ्यांनी ते कर्ज भरलं नाही म्हणून पुन्हा कर्ज मिळणार नाही. अशा पद्धतीची शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. मात्र, आम्ही हे सहन करणार नाहीत. येत्या एका आठवड्यात राज्य सरकारने याबाबतची भूमिका जाहीर करावी. अन्यथा महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या तीनही पक्षाच्या मंत्र्यांना आम्ही राज्यात फिरू देणार नाही”, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
अजित पवार काय म्हणाले होते?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार २८ मार्च रोजी एका कार्यक्रमात बोलताना शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार की नाही? याबाबत मोठं भाष्य केलं होतं. अजित पवार म्हणाले होते की, “मी सभागृहात उत्तर देताना देखील सांगितलं होतं की सगळी सोंगं करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. मी महाराष्ट्रातील जनतेला स्पष्ट सांगतो. ३१ मार्चच्या आत आपआपले पीक कर्जाचे पैसे भरा”, असं अजित पवार म्हणाले होते.