देशात २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल दोन ते तीन महिन्यांनी वाजण्याची शक्यता आहे. राज्यात महाविकास आघाडी महायुतीत लोकसभेच्या जागा वाटपावरून गोंधळ निर्माण झाला आहे. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मोठी घोषणा केली आहे. रविकांत तुपकर यांनी बुलढाणा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं घोषित केलं आहे. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रविकांत तुपकर काय म्हणाले?
“आमचा मूळ प्रश्न सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं आहे. त्या प्रश्नांचं मूळ दिल्लीत आहे. सोयाबीन आणि कापसाचा भाव आणि त्याची धोरणं दिल्लीच्या दराबाबत आखली जातात. म्हणून तरूण शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत माझ्यावर दबाब टाकला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशीर्वादानं आणि लोकवर्गणीतून लोकसभा निवडणूक लढवणार आहे,” असं रविकातं तुपकरांनी सांगितलं.
“महाविकास आघाडीशी युती तोडल्यानंतर ६ मतदारसंघ निश्चित”
यावर ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना राजू शेट्टी म्हणाले, “दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीशी युती तोडल्यानंतर ६ लोकसभा मतदारसंघ निश्चित केले होते. त्यात हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, परभणी आणि बुलढाणा या मतदारसंघाचा समावेश आहे. येथे आम्ही कामाला सुरूवात केली आहे.”
“तुपकर लोकसभा लढवत असतील, तर स्वागत करतो”
“बुलढाणा मतदारसंघ रविकांत तुपकर यांच्यासाठी सोडणार आहोत. तुपकर स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा विचार करत असतील, तर चांगलंच आहे. याचं आम्ही स्वागत करतो. पण, तुपकरांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवावी,” अशी अपेक्षा राजू शेट्टींनी व्यक्त केली आहे.