शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये वाद चिघळण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि नेते रविकांत तुपकर हे समोर-समोर आले आहेत. “जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील कोणत्याही कार्यकर्त्यांशी माझा वाद नाही. माझा आक्षेप हा नेतृत्वाच्या कार्यपद्धीवर आणि भूमिकेबद्दल आहे,” असं म्हणत रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांना लक्ष्य केलं होतं. याला राजू शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते पंढरपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राजू शेट्टी म्हणाले, “हा संघटनात्मक आणि बुलढाणा जिल्ह्यातील वाद आहे. पुण्यात ८ ऑगस्टला शिस्तपालन समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. तेव्हा याविषयावर पडदा पडेल. रविकांत तुपकर यांनी माध्यमांसमोर न बोलता समितीच्या बैठकीत बोलावं.”
हेही वाचा : महायुती किंवा महाविकास आघाडीत जाणार का? राजू शेट्टी म्हणाले…
रविकांत तुपकर यांच्यापाठीमागे भाजपाचा हात आहे का? या प्रश्नावर राजू शेट्टी यांनी म्हटलं की, “समोर चर्चा केल्यावर कळेल, यापाठीमागे कोण आहे. अथवा तुपकर यांच्या मनात काय खदखद आहे. एखाद्या कार्यकर्त्यांच्या मनात अस्वस्थता असेल, तर निश्चित व्यक्त करण्याचा अधिकार आहे. ती योग्य व्यासपीठावर व्यक्त करावी. कारण, संघटनेत लोकशाही आहे.”
हेही वाचा : “महादेव जानकरांची NDA मध्ये कुचंबना, त्यामुळे…”; राजू शेट्टींचं सूचक वक्तव्य
शिवसेना, राष्ट्रवादीप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटना हायजॅक करण्याचा प्रयत्न आहे का? या प्रश्नावर राजू शेट्टी म्हणाले, “स्वाभिमानी हायजॅक होणार नाही. कारण, ती मुळातून तयार झाली आहे. शेतकऱ्यांतून निर्माण झाली आहे.”