मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिला, तर आगामी  लोकसभा निवडणुकीमध्ये खा. राजू शेट्टी यांच्याविरुद्ध मदानात उतरण्याची आपली तयारी असल्याचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

मिरज तालुक्यातील तुंग येथे पेयजल योजनेतून नळपाणी पुरवठा योजनेच्या ४ कोटी ३८ लाखांच्या कामांचा प्रारंभ सदाभाऊ खोत, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा आडमुठे, पंचायत समिती सदस्या जयश्री डांगे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

या वेळी बोलताना राज्यमंत्री खोत म्हणाले की, गेली पस्तीस वष्रे शेतकरी चळवळीत काम केले आहे. तुरुंगवास झाला, कितीतरी वेळा रस्त्यावर उतरलो, मारहाणही झाली, रक्त सांडले. पदयात्रेत पायांना फोड आले, पण मी त्याची छायाचित्रे काढून निवडणुकीत सहानुभूती मिळविली नाही. शेतकऱ्यांच्या आशीर्वादानेच मंत्री झालो आणि काही मंडळींच्या पोटात दुखू लागले, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खा. राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली.

ते पुढे म्हणाले की, कृषिमंत्री झाल्यापासून बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदान, शेतीमालाच्या आधारभूत किमतीत वाढ, ऊस दरात वाढ आणि स्वामीनाथन आयोग लागू करण्यास पाठपुरावा केला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पाणी योजनांसाठी २२५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यतील १७६ पाणी योजनांचा पाठपुरावा करून, त्यांच्या निधीसाठी मंत्रिपदाचा उपयोग करत आहे.

वसंतदादा साखर कारखान्याचे माजी संचालक सचिन डांगे म्हणाले की, तुंग गाव विकास कामांना साथ देणारे आहे. तुंग-बागणी योजना कालबा होऊन पाणी योजनेसाठी अनेक वष्रे पाठपुरावा सुरू होता. पण सदाभाऊंनी योजना मंजूर करून निधी दिला आहे. या वेळी विशाल शिंदे, माजी सरपंच पाटील, उपसरपंच विलास डांगे यांचीही भाषणे झाली.

या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने, सरपंच शहाजी लतिफ, विलास डांगे, सुधाकर पाटील, सागर खोत, आशाराणी नांद्रे, राहुल डांगे, सुकुमार चौगुले, आनंदा दळवी, महादेव नलवडे, गजानन दळवी, प्रसाद पाटील, सुधीर गोंधळी उपस्थित होते.

 

Story img Loader