खासदार राजू शेट्टी यांचा परभणीतील परिषदेत घणाघात
बारामती ही चोरांची पंढरी आहे. लोकांना टोप्या कशा घालायच्या याचे प्रशिक्षण तेथे दिले जाते. त्यामुळेच भाजप नेत्यांनाही बारामतीला जावे लागत आहे, अशी बोचरी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे केली. भाजप सरकारने आमचा विश्वासघात केला. आम्ही मंत्रिपदाची भीक कधी मागितली नाही. हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असे भाकीतही शेट्टी यांनी वर्तविले.
एका परिषदेनिमित्त शेट्टी परभणीत आले होते. पत्रकार बठकीत ते बोलत होते. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळ अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. प्रकाश कापुरे, जिल्हाध्यक्ष माणिक कदम उपस्थित होते. खासदार शेट्टी म्हणाले की, ज्या बारामतीतील २२ गावांत टँकरने पाणीपुरवठा होतो, जेथे टोप्या घालण्याचा सल्ला मिळतो. जमिनी कशा हडप करायच्या याचे प्रशिक्षण मिळते. अशा बारामतीत जाण्याची भाजपात स्पर्धाच लागली आहे, असा आरोप शेट्टी यांनी केला. कोटय़वधींचा सिंचन घोटाळा करणारे, सहकारी बँका, साखर कारखाने बुडवणारे आरोपी मोकाट फिरत आहेत. सर्वच पक्षांत पांढऱ्या कपडय़ातील दरोडेखोर आहेत. मात्र, त्यांना सोडून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा डाव सरकार रचत आहे, असेही त्यांनी सांगितले.
झोपेचे सोंग घेणाऱ्याला जागे करता येत नाही. भाजप सरकारने आमचा विश्वासघात केला. काँग्रेस आघाडी सरकार घालवायला १५ वष्रे लागली. मात्र, या सरकारला दोन वष्रेही लागणार नाहीत. सरकार शेतकऱ्यांच्या हिताआड येत असेल, तर आम्ही रस्त्यावर उतरणारच. आम्ही सरकारचे गुलाम नाही. कृषी विद्यापीठ ग्रामस्थांवर अन्याय करीत आहे. पुनर्वसनाचा प्रश्न कायम असताना कोणाच्या सांगण्यावरून कारवाई होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
शिवसेना-भाजपने आमचा वापर केला. पण आम्ही दुबळे नाहीत आणि कधी त्यांच्याकडे मंत्रिपदाची भीकही मागितली नाही. सरकारच्या निर्णयप्रक्रियेत आम्ही कुठेच सहभागी नसून आम्ही त्यांना केवळ निवडून आणले आहे. तत्कालीन आघाडी सरकारला अहंकार होता. त्या सरकारची धोरणेही चुकीची होती. हे सरकार त्याच धोरणांची री ओढत आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले. शेट्टी यांनी कृषी विद्यापीठातील शेंद्रा प्रकल्पग्रस्तांनी सुरूकेलेल्या उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला.

‘सरकारची ग्रामस्थांवर दादागिरी’
सरकारमधील पुढारी कायद्याचा धाक दाखवून दादागिरी करीत जमिनी बळकावत आहेत. ज्या जमिनीची गरज कृषी विद्यापीठाला नाही, परंतु पालकमंत्र्यांना का, असा सवाल शेट्टी यांनी केला. पुढारी पोसण्याचे काम विद्यापीठाने केले आहे. येथील काही दीडदमडीचे पुढारी प्रकल्पग्रस्तांना पाच-पन्नास हजारांत नियुक्त्या आणून देण्याचे आश्वासन देत आहेत, असा आरोप करीत नाव न घेता भाजपच्या स्थानिक पुढाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधला. ज्यांनी गावावर संकट आणले, तेही संकटात सापडतील. शेंद्रा ग्रामस्थ आता एकटे नसून राज्यातील स्वाभिमानीचे सर्व कार्यकत्रे या लढय़ात सहभागी आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. तुपकर यांनी जीव गेला तरी गाव न सोडण्याचे आवाहन या वेळी केले.

Story img Loader