स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी “प्रशासकीय अधिकाऱ्यांना मंत्र्यांना किंवा राजकीय कार्यकर्त्यांना खंडणी देऊन बदल्या कराव्या लागतात,” असा गंभीर आरोप केला आहे. तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्याही न्याय व्यवस्थेप्रमाणे कराव्यात, अशी मागणी केली. यानंतरही अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला, तर त्यांना उघडंनागडं करून मारल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही शेट्टींनी दिला. ते बुधवारी (२ नोव्हेंबर) पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथे ऊस परिषदेला आले असताना पत्रकारांशी बोलत होते.
राजू शेट्टी म्हणाले, “मंत्र्यांना किंवा राजकीय कार्यकर्त्यांना खंडणी देऊन बदल्या कराव्या लागत असतील, तर हे सरकारी नोकर म्हणजे साधूसंत नाहीत. ते मोकाटपणे सर्वसामान्य जनतेला लुटतात आणि पुढच्या खंडणीची व्यवस्था करतात. हा त्याचा साधा अर्थ आहे. हा भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर पहिल्यांदा बदल्यांचे अधिकार काढून घेतले पाहिजेत.”
“…तर त्या अधिकाऱ्याला उघडंनागडं करून मारल्याशिवाय सोडणार नाही”
“न्याय व्यवस्थेत ज्या पद्धतीने संगणकीकृत बदल्या होतात तशाच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या तर हा बाजार बंद पडेल. त्यानंतर जर कुणी सरकारी नोकर भ्रष्टाचार करायला लागला, तर त्या अधिकाऱ्याला उघडंनागडं करून मारल्याशिवाय सोडणार नाही,” असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
व्हिडीओ पाहा :
ऊस दराच्या प्रश्नावर राजू शेट्टी म्हणाले, “राज्य सरकारला ऊस उत्पादकांच्या मागण्या मान्यच कराव्या लागतील. गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये अतिवृष्टी झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली की,शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये द्या. या वर्षी पुन्हा अतिवृष्टी झाली, आता उद्धव ठाकरे विरोधी पक्षात आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. आता उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये द्या अशी मागणी केली, पण शिंदे-फडणवीस सरकारने फक्त १३ हजार ५०० रुपये दिले.”
हेही वाचा : “…अन्यथा, शेतकऱ्यांच्या त्याच छत्र्यांचे टोकदार भाले होतील”; राजू शेट्टींचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा
“किमान तुम्ही विरोधी पक्षात असताना मागत आहात ते सत्तेत आल्यावर तरी द्या. याचा अर्थ शेतकऱ्यांचा वापर फक्त राजकारणासाठी केला जात आहे,” असा गंभीर आरोप राजू शेट्टींनी केला. तसेच उपमुख्यमंत्री फडणवीसांवर सडकून टीका केली.