स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना तुडवू, असा इशारा दिला आहे. तसेच जनतेला लुबाडायचे आणि त्यांच्या घरावर दरोडे घालायचे बंद करा, असंही मत व्यक्त केलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतीला सलग १० तास दिवसा वीज पुरवठा करावा या मागणीसाठी बुधवारी (२३ फेब्रुवारी) दुसऱ्या दिवशीही कोल्हापूरमधील महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. राजू शेट्टींसह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी ते बोलत होते.
राजू शेट्टी म्हणाले, “महावितरणच्या वीज निर्मितीमध्ये साखर कारखान्यापेक्षाही मोठा घोटाळा आहे. तो लवकरच चव्हाट्यावर आणू. कंपनीमध्ये मंत्र्यांचे लागेबांधे आहेत. जनतेच्या पैशाची महाविकास आघाडी सरकारकडून लूट सुरू आहे. शेतकऱ्यांचे वाटोळे करत असेल, तर मंत्र्यांनाही तुडवू. जनतेला लुबाडायचे, त्यांच्या घरावर दरोडे घालायचे धंदे बंद करावे.
“माणसापेक्षा जंगली प्राण्यांना किंमत”
“विजेचा धक्का लागून हत्ती मारला गेला, तर नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांकडून २५ कोटी रुपयांची वसुली केली जाते. शेतकऱ्याला विजेचा धक्का बसून मृत्यू झाला तर केवळ २ लाख रूपये नुकसान भरपाई दिली जाते. माणसापेक्षा जंगली प्राण्यांची किंमत जास्त आहे. या तीन कुबड्याच्या सरकारने शेतकऱ्यालाच अस्थिर केले आहे. सरकारमधील मंत्र्यांना सत्तेची मस्ती आली आहे. सत्तेच्या धुंदीत जनता तुम्हाला रस्त्यावर आणेल,” असा इशाराही शेट्टी यांनी दिला.
हेही वाचा : कर्जमाफी नको, कर्जमुक्ती द्या- राजू शेट्टी
यावेळी जालंधर पाटील, राजेंद्र गड्ड्यान्नावर, जनार्दन पाटील, जयकुमार कोले, सागर कोंडेकर, सचिन शिंदे, विक्रम पाटील, सागर संभूशेटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.