स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान मिळावे या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. या मागणीसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित दाखवली. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारने ९ ऑगस्टपर्यंत मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. तसेच पावसात आंदोलनाला आलेल्या शेतकऱ्यांच्या छत्र्यांचे टोकदार भाले झाल्याशिवाय राहणार नाही, असं सूचक वक्तव्य केलं.

महाविकास आघाडी सरकारने नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र, ते सरकार पडल्यानंतर नवीन आलेल्या शिंदे सरकारने हा निर्णय रद्द केला आहे. या निर्णयासाठी अर्थ संकल्पात १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, हा निर्णय रद्द झाल्यामुळे हा निधी हे सरकार दुसरीकडे वळवणार असल्याचा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी या धडक मोर्चात केला. दिवसभर पावसाची संततधार असतानाही या धडक मोर्चाला मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

“…अन्यथा, त्याच छत्र्यांचे टोकदार भाले झाल्याशिवाय राहणार नाहीत”

राजू शेट्टी म्हणाले, “नियमित कर्ज भरणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांच्या याद्या तयार आहेत. फक्त शासन निर्णय होणं बाकी आहे. महाराष्ट्रात राजकीय साठेमारी सुरू आहे. त्यात कृपा करून शेतकऱ्याला घेऊ नका. हा निर्णय आधीच झाला आहे. घोषणा अडीच वर्षापूर्वीची आहे, अर्थसंकल्पात तरतुद ६ महिन्यापूर्वी झाली आहे. त्यामुळे ९ ऑगस्टच्या आत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत. अन्यथा, आज शेतकरी छत्र्या घेऊन मोर्चाला आलेत, त्याच छत्र्यांचे टोकदार भाले झाल्याशिवाय राहणार नाहीत.”

“…तर, आम्ही पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग बेमुदत रोखून धरू”

“९ ऑगस्टला क्रांती दिन आहे. ९ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये जमा झाले नाही, तर आम्ही पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग बेमुदत रोखून धरू. ११ वर्षापूर्वी २०११ ला अशाच पद्धतीचं आंदोलन झालं होतं. तो इतिहास ताजा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो इतिहास पोलीस अधिकाऱ्यांकडून तपासून घ्यावा. त्याच पद्धतीने आक्रमकपणे हे आंदोलन होईल. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये. त्याआधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करा,” अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.

हेही वाचा : “राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीतून माझे नाव…”, आघाडीतून बाहेर पडल्यानंतर राजू शेट्टींचं मोठं विधान

“शासन निर्णय झालाय, केवळ त्यावरील स्थगिती उठवण्यासाठी आम्ही १ महिन्याचा वेळ दिला आहे. त्या काळात सरकारने हा निर्णय घ्यावा,” असंही राजू शेट्टी यांनी नमूद केलं. या मागण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार असल्याची माहितीही राजू शेट्टी यांनी दिली.

Story img Loader