स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगलेमधून स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राजू शेट्टींचा पक्ष महाविकास आघाडीत सहभागी होईल आणि मविआच्या पाठिंब्यावर ते निवडणूक लढवतील अशी चर्चा चालू असतानाच शेट्टी यांनी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मशाल या चिन्हावर हातकणंगलेमधून लोकसभा निवडणूक लढवतील असं बोललं जात होतं, ठाकरे गटाने राजू शेट्टींना तसा प्रस्तावदेखील दिला होता. परंतु, शेट्टी यांनी हा प्रस्ताव नाकारत स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, राजू शेट्टी यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या आगामी योजनांवर भाष्य केलं. तसेच यावेळी प्रसारमध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना शिवसेनेबरोबरच्या (ठाकरे गट) घरोब्यावरून प्रश्न विचारल्यावर राजू शेट्टी म्हणाले, शिवसैनिकांनी विनंती केल्यामुळे मी ‘मातोश्री’वर उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. तेव्हाच मी महविकास आघाडीत येणार नाही असं सांगितलं होतं, मला कोणत्याही आघाडीबरोबर संबंध ठेवायचे नाहीत असंही मी त्यांना सांगितलं होतं. शिवसेनेने हातकणंगलेत उमेदवार उभा न करता ती जागा रिकामी सोडावी असं आमचं म्हणणं होतं. तसं केल्यास आम्हाला त्याचा फायदा होईल, असंही आम्ही उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं. उध्दव ठाकरे यांना ते पटलं होतं, त्यानंतर याविषयी घोषणा करू असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. मात्र अचानकच त्यांनी आपला उमेदवार जाहीर केला. मी गेली २४ वर्षे शेतकऱ्यांच्या चळवळीत काम करत आहे. मग मी माझा पक्ष विलीन करायचा का? शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं का? म्हणून मी त्यांना नकार दिला.
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराबाबत राजू शेट्टी म्हणाले, या वेळचा वंचितचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा सदस्य आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल मला काय म्हणायचं आहे ते तुम्ही समजून घ्या. लोकसभेच्या जागांबाबत राजू शेट्टी म्हणाले, मी घेतलेली भूमिका लोकांना मान्य आहे, त्यामुळे आजही आम्ही सहा जागांवर ठाम आहोत. त्यामुळे आम्ही सहा जागा लढण्याची चाचपणी करत आहोत.
यावेळी राजू शेट्टी यांना प्रश्न विचारण्यात आला की, स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापुरात त्यांचा उमेदवार उभा करणार का? यावर राजू शेट्टी म्हणाले, कोल्हापूरात छत्रपती शाहू महाराज (द्वितीय) यांच्याविरोधात उमेदवार द्यायचा की नाही याबाबतचा निर्णय आम्ही अद्याप घेतलेला नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून याबाबतचा निर्णय घेऊ. राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितलं की, येत्या १५ एप्रिल रोजी ते बैलगाडीतून प्रवास करत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.