भारतीय विमान प्राधिकरण व एअर इंडियाकडून प्रवाशांची लुबाडणूक केली जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. दोन दिवस आधी तिकीट काढूनसुद्धा प्रवाशांना सीट उपलब्ध करून न देता ऐनवेळेस येणाऱ्या प्रवाशांना जादा दराने तिकीट विक्री केली जात असल्याचेही ते म्हणाले. तसेच याबाबत केंद्रीय नागरी विमान उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी?
मी काल दिल्लीहून पुण्याला येत होतो. संध्याकाळी ७ वाजता माझे विमान होते. त्यासाठी मी बोर्डींग बंद होण्याच्या ४५ मिनीट आधी विमानतळावर पोहोचलो. मात्र, मला बोर्डींग बंद झाल्याचे सांगण्यात आलं. याबाबत विचारणार केली असता, मला पोहोचायला उशीर झाला असून इतर प्रवाशांना तिकीट देण्यात आल्याचे मला सांगण्यात आलं, दोन दिवसांपूर्वी तिकीट बूक केलं असतानाही मला प्रवास नाकारण्यात आला. मात्र, अर्धा तासाच्या गोंधळानंतर मला त्याच विमानात दोन सीट उपलब्ध करून देण्यात आल्या, अशी माहिती राजू शेट्टी यांनी यांनी दिली. तसेच एअर इंडियाकडून अर्धा तास आधी याच विमानासाठी प्रवाशाकडून जादा पैसे आकारून तात्काळ तिकीट उपलब्ध करून देण्यात आले होते, असा आरोपही त्यांनी केला.
पुढे बोलताना, काही दिवसांपूर्वीही असाच प्रकार घडल्याचेही त्यांनी सांगितले. १८ ॲाक्टोंबर रोजी मी मुंबई ते भोपाळचे तिकीट चार दिवस आधीच काढले होते. मी सकाळी ४ वाजताच विमानतळावर पोहचलो. दरम्यान, बोर्डिंग पास काढण्यासाठी गेले असता एअर इंडियाच्या प्रशासनाकडून सीट उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. बराच काळ वाद घातल्यानंतर त्यांना त्याच विमानाचे बिझनेस क्लासचे तिकीट उपलब्ध करून दिले होते, अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा – “याबाबत मी कधीच…”, आदित्य ठाकरेंवरील आरोपांवर सुप्रिया सुळेंचं टीकास्र; म्हणाल्या, “गलिच्छ..!”
दरम्यान, भारतीय विमान प्राधिकरणाने प्रवाशी क्षमतेपेक्षा जादा बुकींग घेण्याच्या दिलेल्या परवानगीचा फटका प्रवाशांना बसतो आहे. याबाबत संबधित एअर लाईन्स कंपनीकडून कोणतीही पूर्वसूचना न देता चार दिवस आधी बुकींग करूनही व वेळेत विमानतळावर पोहचूनही सीट उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे, असा अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली. तसेच भारतीय विमान प्राधिकरण व एअर इंडियाच्या या कारभाराबाबत केंद्रीय नागरी विमान उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांच्याकडे तक्रार केली असल्याचेही ते म्हणाले.