तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव हे सध्या सातत्याने महाराष्ट्रात येत आहेत. त्यांच्या पक्षाचा राज्यात विस्तार करण्याचा प्रयत्न करत ते आहेत. याचदरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील अनेक शेतकरी नेत्यांना, तसेच विविध पक्षांमधील नाराज नेत्यांना बीआरएसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनाही बीआरएसने पक्षात येण्याची तसेच मुख्यमंत्रीपदाची (बीआरएसचा राज्यातील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा) ऑफर दिली आहे. स्वतः शेट्टी यांनी याबद्दलची माहिती दिली.
राजू शेट्टी म्हणाले, भारत राष्ट्र समितीकडून मला सांगण्यात आलं होतं की, तुम्ही जर आमच्या पक्षात आलात तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून आम्ही तुम्हाला पुढे करू. राज्यात शेतकऱ्यांचं राज्य असेल आणि त्यासाठी पक्षाचा चेहरा म्हणून तुम्ही असाल. तसेच त्यांनी माझा पक्षाच्या कोअर कमिटीत सदस्य म्हणून समावेश करू असंही सांगितलं. परंतु त्यांच्या या प्रस्तावास मी नम्रपणे नकार दिला आहे.
दरम्यान, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शेट्टी यांना विचारलं की, निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर तुमची बीआरएसशी युती होईल का? त्यावर राजू शेट्टी म्हणाले, ते (केसीआर) माझे जुने मित्र आहेत. २००९ पासून ते २०१४ पर्यंत ते खासदार होते. त्यामुळे आमची चांगली मैत्री होती, ही मैत्री अजूनही आहे. परंतु त्यांची नेमकी भूमिका काय आहे ते बघावं लागेल, अजून त्यांचं मॉडेल काय आहे ते मी बघितलं नाही, ते पूर्णपणे तपासलं नाही. कारण अशीच आभासी प्रतिमा घेऊन १० वर्षांपूर्वी आमची फसगत झाली आहे.
हे ही वाचा >> “चंद्रशेखर रावांकडून राजू शेट्टींना मुख्यमंत्रीपदाची ऑफर…”, काय झालं पुढे…
राजू शेट्टी म्हणाले, यापूर्वी एकदा आमची फसगत झाली आहे. सबका साथ, सबका विकासच्या नावाखाली आमची फसगत झाली आहे. त्यावेळी आम्हाला शेतमालाला दीडपट हमीभाव देऊ, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, अशी आश्वासनं देण्यात आली होती. आम्हाला त्यांचं गुजरात मॉडेल दाखवलं गेलं. परंतु ते सगळं फोल ठरलं आणि शेतकरी आत्महत्या वाढल्या. पुन्हा अशी फसगत होणार नाही याची खात्री करणं गरजेचं आहे. ते (केसीआर-बीआरएस) खरोखर आणि प्रामाणिकपणे काही करत असतील आणि तसा त्यांचा अजेंडा असेल तर ते सध्या माहिती नाही.