जालना : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग राजकारणी, कंत्राटदार आणि नोकरशहा यांनी केलेला मोठा घोटाळा आहे आणि सार्वजनिक पैशाची लूट असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.शक्तिपीठ महामार्ग हा विकासाचा उपक्रम नाही तर स्वार्थासाठी चालवलेला प्रकल्प आहे. सामान्य लोक आणि शेतकऱ्यांच्या किमतीवर काही निवडक लोकांना फायदा व्हावा यासाठी हा प्रकल्प आखला असल्याचे सांगत राजू शेट्टी म्हणाले, ‘८१० किलोमीटर लांबीचा आणि महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या प्रकल्यासाठी अंदाजे ८६,३०० कोटी रुपये खर्च येणार आहे. हा प्रकल्प २८,००० कोटी रुपयांचा असायला हवा होता, परंतु तो जवळपास ५८,००० कोटी रुपयांनी वाढवला आहे.

या महामार्गासाठी ५५ हजार शेतकऱ्यांची २७,००० एकरपेक्षा जास्त जमीन संपादित करणे प्रस्तावित आहे. त्यासाठी सरकार तुटपुंजी भरपाई देत आहे. भूसंपादनाच्या २०१३ मध्ये केलेल्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या मूळ तरतुदी कमकुवत झाल्या आहेत. त्याचा राज्य सरकार लाभ उठवत आहे.