दिगंबर शिंदे

भाजपची साथ सोडत शेट्टी आघाडीच्या गोटात

ऊस दरावरून चळवळ उभी करत राजकीय नेतृत्व हस्तगत करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी बदलत्या राजकीय समीकरणात साखर कारखानदारीतील दिग्गज मानले गेलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्याशी जुळवून घेत असून याचाच प्रत्यय मंगळवारी आला. बदलत्या वाऱ्याची दिशा सांगण्यासाठी आ. पाटील यांचे सारथ्य असलेल्या सायकलवर बसून शेट्टी यांनी आपणही वारे येईल तसे बदलू शकतो हेच सांगत सत्तेसाठी कोणीही कायमचे शत्रू असत नाही हेच अधोरेखित केले.

कालपरवापर्यंत म्हणजे इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत जयंत पाटील यांच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी सर्वच विरोधकांना एकाच छताखाली घेणारे शेट्टी यांनी भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर पाटील यांच्याशी सूर जुळविले आहेत. कालपर्यंत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत तुटून पडणाऱ्या या दोन नेत्यांना बदलत्या राजकीय समीकरणामध्ये एकत्र यायला भाग पाडले आहे. अचानक बदललेला हा पवित्रा जनतेला सांगणे या दोन्हीही नेत्यांना अवघड जाणार असल्याने विविध क्लृप्त्या लढवत हे दोन नेते एकत्र येत आहेत. सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येत हा संदेश देण्याचा हे दोन्ही नेते आवर्जुन प्रयत्न करीत आहेत.

पश्चिम महाराष्ट्राच्या ऊस पट्टय़ात ऊस दराचे आंदोलन हाती घेऊन पंचायत समितीपासून दिल्लीच्या खासदारपदापर्यंत व्हाया आमदारकी असा प्रवास शेट्टी यांनी केला. या प्रवासात साखर कारखानदार कसे लुबाडतात हे सांगत असताना यावर वर्चस्व असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेपासून बाजूला केल्याविना प्रश्न मिटणार नाहीत, असे सांगत शेट्टींनी आपल्या राजकीय जीवनाचा पाया रचला होता. त्यांची संपूर्ण राजकीय कारकिर्दच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधावर उभारलेली होती. बदलत्या राजकीय समीकरणात त्यांनी भाजपशी फारकत घेतली. त्यानंतर त्यांनी प्रत्येक कार्यक्रमातून भाजपवर टीकेची झोडही उठवली. त्यांचा इथपर्यंतचा प्रवास सामान्य मतदाराला मानवणारा होता. पण बदलत्या राजकीय स्थितीत त्यांनी आजवर उभी हयात ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोध केला त्या आघाडीच्या कळपात घुसण्याचा प्रयत्न सुरू केल्यावर त्यांची अडचण सुरू झाली आहे.

कालपर्यंत आरोपीच्या पिंजऱ्यात असणाऱ्या, शेतकऱ्यांचे शत्रू असणाऱ्या या दोन पक्षांना एकाएकी शेतकऱ्यांचे तारणहार ठरवण्याची वेळ सध्या त्यांच्यावर आली आहे. आजवर वर्षांनुवर्षे जपलेले राजकीय, वैचारिक शत्रुत्व गुंडाळून गळय़ात गळे घालण्याचा बिकट काळ उभा राहिला आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये शेट्टी यांनी आघाडीच्या नेत्यांशी जवळीक साधण्याची तयारी केली आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील वाळवा आणि शिराळा या विधानसभा मतदारसंघात  जयंत पाटील यांचे प्राबल्य आहे. बदलत्या काळात राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी झालेल्या राजकीय काडीमोडानंतर वजा होणाऱ्या मतांची बेगमी करण्यासाठी आघाडीच्या नेत्यांशी घरोबा करण्याशिवाय त्यांना तसा पर्यायदेखील नव्हता. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी नववर्षांचे स्वागत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सायकल फेरीत आ. पाटील यांच्यासोबत दोन किलोमीटर अंतराची एकाच सायकलवरून रपेट मारली. कधीकाळी एकमेकांना पाण्यात पाहणारे हे दोन नेते एकाच सायकलवर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. तसेच राजकारणात कालचा शत्रू हा आजचा मित्र ठरू शकतो याची पुन्हा प्रचितीही आली.

Story img Loader