राज्यात शेतकऱ्यांच्या वीज तोडणीच्या मुद्य्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपाने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला या मुद्य्यावरून लक्ष्य केले होते. शिवाय, राज्यात शेतकरी देखील अनेक ठिकाणी सराकरविरोधात आक्रमक आंदोलन करत असल्याने, अखेर महाविकास आघाडी सरकारने आज अर्थसंकल्पीय अधिवेशनातच शेतकऱ्यांच्या वीज तोडणीसंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला.. शेतकऱ्यांच्या वीज तोडणीची कारवाई तात्पुरत्या स्वरूपात थांबवत असल्याची आणि ज्या शेतकऱ्यांची वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे तो पूर्ववत देखील करण्याची घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली. या निर्णयाचे विरोधकांनी स्वागत केलं आहे. तर शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावरून आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील या निर्णयाबद्दल ऊर्जामंत्र्यांचे आभार मानले आहेत.
शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन तोडणीला राज्य सरकारने स्थगिती दिल्याबद्दल ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची मंत्रालयात भेट घेऊन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसेच, दिवसा वीज पुरवठ्याचा निर्णय त्वरीत घ्यावा, अशी मागणी देखील यावेळी राजू शेट्टी यांनी ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे. तर, यावर तुमच्या प्रस्तावावर तज्ज्ञांची समिती गठित केली असून अहवाल आल्यावर निर्णय घेऊ. अशी ग्वाही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यावेळी राजू शेट्टी यांना दिली.
शेतकऱ्यांच्या वीज तोडणीसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय, ऊर्जा मंत्र्यांनी विधानसभेत केली घोषणा!
शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या या मागणीसाठी कोल्हापूर येथे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर राजू शेट्टी यांनी बेमुदत ठिय्या आंदोलनास बसले होते. शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज द्या, वाढीव वीज दर रद्द करा, वीज तोडणी मोहीम थांबवा, वीज बिले दुरुस्त करून द्या आदीसह अन्य मागण्यासाठी त्यांचे आंदोलन सुरू होते. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातही आंदोलनाची तीव्रता अधिक वाढली होती. अनेक आंदोलक शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊलही उचललं होतं. नुकतच एका शेतकऱ्याने महावितरण कार्यालयात जाऊन आत्मदहनाचा देखील प्रयत्न केला होता. तर, या अगोदर काही शेतकऱ्यांनी महानवितरण कार्यालयात साप देखील सोडला होता. याशिवाय सांगली इस्लामपूर रस्त्यावरील कसबे डिग्रज येथील महावितरणचे कार्यालय पेटविण्यात आले होते.